प्रतिबंधित अन्नपदार्थांवर एफडीएची धडक कारवाई
१३.६९ लाखांचा साठा जप्त; मुंबईत १५ ठिकाणी छापे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) बृहन्मुंबईने प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहरातील विविध भागांत छापे टाकले. १ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत झालेल्या कारवाईत एकूण १५ ठिकाणी गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा, मावा आदी प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे १३ लाख ६९ हजार २९३ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ जणांना अटक करण्यात आली आहे. मालाड, कुर्ला, सांताक्रूझ, भांडुप, धारावी, मुलुंड, नळबाजार आणि बोरिवली या भागांत ही कारवाई करण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली.
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जनतेला सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळावे हा उद्देश आहे. त्यानुसार महाराष्ट्रात १६ जुलै २०२५ पासून गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट किंवा सुगंधित तंबाखू, सुपारी आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवण, वितरण, वाहतूक व विक्रीवर बंदी लागू आहे. तरीही काही ठिकाणी या पदार्थांचा बेकायदेशीर साठा आणि विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.
एफडीएच्या या कारवाया मंत्री नरहरी झिरवाळ, सचिव धीरज कुमार, आयुक्त श्रीधर डुबे पाटील आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रतिबंधित पदार्थांबाबत माहिती असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी.
घातक परिणामांचा इशारा
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे अधोरेखित करत, नागरिकांनी या पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन सह आयुक्त महेश चौधरी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.