माजी कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता वाटप सुरू
बेस्टकडून दिलासा; २९ कोटी रुपये देणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमात कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. निवृत्त आणि सेवामुक्त झालेल्या सुमारे नऊ हजार ७७ कर्मचाऱ्यांचा प्रलंबित ‘कोविड भत्ता’ अखेर वितरित करण्यात आला असून, प्रशासनाने एकूण २९ कोटी २२ लाख ३८ हजार ७१७ रुपयांचा निधी थेट कर्मचाऱ्यांच्या पदरात टाकला आहे.
कोरोना काळात जेव्हा संपूर्ण मुंबई ठप्प होती, तेव्हा बेस्टचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले होते. या कामाचा मोबदला म्हणून जाहीर झालेला भत्ता मिळवण्यासाठी माजी कर्मचारी दीर्घकाळ प्रतीक्षेत होते. अखेर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात भत्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
या भत्ता वाटपात सर्वाधिक लाभ वाहतूक आणि अभियांत्रिकी विभागातील माजी कर्मचाऱ्यांना झाला आहे. या विभागातील ६,८३७ कर्मचाऱ्यांना २२ कोटी १९ लाख ९१ हजार ९८३ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, पुरवठा विभागातील १,८२० कर्मचाऱ्यांना पाच कोटी ८२ लाख ५३ हजार ४३० रुपये, तर सामान्य विभागातील ४२० कर्मचाऱ्यांना एक कोटी १९ लाख ९३ हजार ३०४ रुपये मिळाले आहेत.
आनंदाचे वातावरण
दीर्घकाळापासून रखडलेली ही रक्कम मिळाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. ‘कोविड योद्धा’ म्हणून केलेल्या कष्टाची दखल प्रशासनाने घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे रकमा अद्याप जमा झाल्या नाहीत, त्यांचेही प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
विभागीय वाटपाचा आढावा :
-वाहतूक व अभियांत्रिकी विभाग : २२.१९ कोटी (६,८३७ कर्मचारी)
-पुरवठा विभाग : ५.८२ कोटी (१,८२० कर्मचारी)
- सामान्य विभाग : १.१९ कोटी (४२० कर्मचारी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.