भुयारी मेट्रोच्या कामाचा सुमार दर्जा
स्थानकात अनेक ठिकाणी फिनिशिंगचा अभाव; कुठे विद्युत बोर्ड उचकटले, तर कुठे ग्रॅनाईट निघाल्याचे चित्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईकरांना गारेगार आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता यावा, यासाठी एमएमआरसीने उभारलेल्या आरे-कफ परेड भुयारी मेट्रोच्या कामाचा दर्जा सुमार असल्याचे समोर आले आहे.
कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे अनेक स्थानकातील कामाचे योग्य फिनिशिंग नसल्याचे दिसत आहे. कुठे विद्युत बोर्ड उचकटले, तर कुठे ग्रॅनाईट निघाल्याचे, स्वयंचलित जिना आणि भिंतीमधील फटी योग्यरीत्या भरले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने कंत्राटदाराच्या गलथान कामाकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित होत आहे.
एमएमआरसीने आरे ते नरिमन पॉइंट दरम्यान तब्बल ३३ किलोमीटर लांबीची भुयारी मेट्रो प्रकल्पाची बांधणी करून ऑक्टोबर २०२५ मध्ये संपूर्ण मार्गिका प्रवाशांच्या सेवेत आणली आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असल्याने कामात कोणत्याही त्रुटी राहून नयेत म्हणून सुरुवातीपासून एमएमआरसीएलने वॉच ठेवला होता. मात्र, संपूर्ण मार्गिका सुरू होऊन सहा-सात महिने उलटल्यानंतरही अनेक ठिकाणी स्थान कातील कामाचे योग्यरीत्या फिनिशिंग झाले नसल्याचे प्रवाशांच्या नजरेला पडत आहे. अनेक ठिकाणी भिंतीवर असलेले विद्युत बोर्ड उचकटले असल्याचे दिसून येत आहे.
जीना, स्वयंचलित जिन्याच्या ठिकाणी भिंतीला लावलेले ग्रॅनाईट निघाले आहे. स्वयंचलित जिन्यावरून चढत असताना वरती पहिल्यास भिंत आणि जिन्याच्या फटीतून सूर्यप्रकाश दिसून येत असल्याचे चित्र धारावी, शीतलादेवीसह अनेक स्थानकात आहे. त्यामुळे एमएमआरसी कामाचे फिनिशिंग कधी पूर्ण करून घेणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
मेट्रो-३ ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असल्याने त्याचे काम उत्कृष्ट असायला हवे, पण कंत्राटदारांच्या कामचुकारपणामुळे अनेक ठिकाणी कामात फिनिशिंग नाही. त्यामुळे संबंधित कंत्रादारावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करायला हवी.
- अनिल गलगली, सामजिक कार्यकर्ते
भुयारी मेट्रोच्या स्थानकातील कामात अनेक त्रुटी आहेत. अनेकदा स्वयंचलित जिने, लिफ्ट बंद असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करावा की नको असा प्रश्न पडतो. बंद झालेला स्वयंचलित जिना तत्काळ सुरू करण्यासाठी पुरेसे तांत्रिक कर्मचारी नसल्याचे अनेकदा निदर्शनास येते.
- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते