संशोधनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची गरज
डॉ. अनिल काकोडकर यांचे मत
मुंबई, ता. १७ ः ज्ञाननिर्मिती, सामाजिक विकास आणि आर्थिक प्रगती यांचा मूलाधार असलेली संशोधन संस्कृती अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करत, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संशोधनाचे महत्त्व अत्यंत निर्णायक असल्याचे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी मुंबई विद्यापीठातील कार्यक्रमात व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने, विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या तीन जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकांकडून संशोधन प्रस्ताव सादर करण्यासाठी गुरुवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता विद्यानगरी, कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शक डॉ. अरुण सप्रे, आदी उपस्थित होते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी संशोधन ही केवळ शैक्षणिक प्रक्रिया नसून ती समाजाभिमुख परिवर्तनाचे साधन असल्याचे सांगत विद्यापीठांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता, स्थानिक समस्यांवर उपाय शोधणारे आणि समाजाला थेट लाभ देणारे संशोधन पुढे आणणे आवश्यक असल्याचे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या या प्रकल्पाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी व समाजाभिमुख नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून स्थानिक गरजा, आव्हाने आणि समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या बैठकीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्याअंतर्गत संशोधनासाठी केलेल्या अर्थसहाय्यासाठी आयोगाचे आभार मानले. पहिल्या टप्प्याअंतर्गत १० संशोधन प्रकल्प पूर्णत्वास आले असून या प्रकल्पांना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राच्या वतीने स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले जाणार असल्याचे सांगितले.
ज्ञाननिर्मितीवर भर देणे गरजेचे
ग्रामीण आणि तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी केलेले संशोधन जागतिक स्तरावरील संशोधनाइतकेच महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. संशोधन करताना कोणताही पूर्वग्रह न ठेवता नव्या ज्ञाननिर्मितीवर भर देणे गरजेचे असून मूलभूत संशोधनासोबतच समाज, उद्योग आणि विकासाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनुप्रयुक्त संशोधन वाढविण्यावर विशेष भर देण्यात यावा, असेही त्यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.