ज्येष्ठांसाठी लोकलमध्ये आता स्वतंत्र डबा!
पहिल्या टप्प्यात ३३ गाड्यांमध्ये सुविधा
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : प्रचंड गर्दीमुळे लोकल प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय आता लवकरच दूर होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून लोकल गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा आणि स्वतंत्र आसनव्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३३ लोकलमध्ये बदल करणे सुरू झाले असून, महिनाभरात ज्येष्ठांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
मुंबईची लोकल लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी असली तरी ज्येष्ठांसाठी लोकलचा प्रवास अनेकदा त्रासदायक ठरतो. सध्या प्रत्येक लोकलमध्ये केवळ १४ आसने ज्येष्ठांसाठी राखीव असली तरी गर्दीवेळी त्यांना बसण्याची संधी मिळत नाही. चढ-उतार करतानाही मोठा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाने या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नव्या योजनेनुसार, पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील मालडब्याचे रूपांतर करून तो ज्येष्ठांसाठी राखीव करण्यात येत आहे. चर्चगेट दिशेकडील सातव्या डब्यात हा विशेष बदल केला जात आहे. त्यात १३ ज्येष्ठांना बसता येईल, तर ५० पेक्षा अधिक प्रवाशांना उभे राहता येईल. यामुळे ज्येष्ठांना गर्दीचा सामना न करता तुलनेने आरामदायी प्रवास करता येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
----
लवकरच प्रवाशांच्या सेवेत
पश्चिम रेल्वेकडे सध्या ११२ लोकल रेक असून, त्यापैकी ९६ प्रत्यक्ष धावत आहेत. या सर्व रेकमध्ये टप्प्याटप्प्याने ज्येष्ठांसाठी विशेष डब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ३३ लोकलमध्ये काम सुरू झाले असून, आतापर्यंत २७ लोकल गाड्यांमध्ये बदल झाला आहे. लवकरच या लोकल नव्या बदलांसाठी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
---
सुरक्षिततेवर विशेष भर
विशेष डब्यात दरवाजाजवळ मजबूत आधार, पकडण्यासाठी रेलिंग आणि आपत्कालीन शिड्यांची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांना गर्दीतही सुरक्षितपणे चढ-उतार करता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.