नेस्को कॉन्सर्ट प्रकरण
----
ड्रग्जविक्रेत्यांना कुटुंबीयांची साथ
तस्करीचे पैसे बहीण, पत्नीच्या खात्यांवर जमा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रातील कॉन्सर्ट प्रकरणातील अटक विद्यार्थ्यांसह अन्य आरोपींना ड्रग्जविक्रीत त्यांच्या कुटुंबीयाची साथ असल्याची माहिती हाती लागल्याचा दावा वनराई पोलिसांनी सोमवारी केला. ड्रग्जविक्रीतून आलेले पैसे हे बहीण, पत्नीच्या बँक खात्यावर पाठवल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींच्या कुटुंबीयांभोवतीही चौकशीचा फास आवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एक्स्टॅसी पुरवणाऱ्या आयुष साहित्य, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल यांच्यात ११ एप्रिल रोजी कॉन्सर्टदरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार घडले. विशेष म्हणजे ही आर्थिक देवाणघेवाण १० दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. ती कॉन्सर्टनंतरही सुरूच होती. तिघांची चौकशी आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणावरून, एका बड्या एक्स्टॅसी वितरकाचे नाव पुढे आले. सध्या त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. याच वितरकाकडून आरोपी विद्यार्थ्यांनी कॉन्सर्टमध्ये विक्रीसाठी एक्स्टॅसीचा साठा घेतला. तो विकून त्यांनी या व्यक्तीसह त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचे उघड झाले. इतकेच नव्हे, तर आरोपी विनीतने प्रमुख आरोपी आयुषच्या बहिणीच्या बँक खात्यावर मोठी रक्कम टप्प्याटप्याने वळती केली. हा व्यवहार ११ एप्रिल रोजी नेस्को केंद्रात कॉन्सर्ट सुरू असताना घडल्याचे स्पष्ट झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या आर्थिक व्यवहारांवरून फरार वितरकाची पत्नी आणि अटक आरोपी आयुषची बहीण ड्रग्जविक्रीत अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. या दोघींकडे लवकरच आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
----
कंत्राटदारांचीही चौकशी
नेस्को आणि नागपूरच्या इन्स्पायरिंग टाय कंपनीने आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाला दिली. आयोजकांच्या संगनमताशिवाय हे शक्य नसल्याचा पुनरुच्चारही पोलिसांनी केला. त्या दृष्टीने तपास करण्यासाठी कॉन्सर्टसाठी कंपन्यांनी नेमलेल्या कंत्राटदारांकडेही पोलिस चौकशी करणार आहेत.
---
ड्रग्जविक्रेत्यांना विनातिकीट प्रवेश
आयोजकांनी सुरक्षेसाठी नेमलेल्या सेफक्युअर कंपनीचा सुरक्षा रक्षक प्रदीप गुप्ताने आरोपी आयुष, विनीत यांच्याप्रमाणे अन्य अमली पदार्थ विक्रेत्यांनाही विनातिकीट, विनाझाडाझडती कॉन्सर्टमध्ये सोडल्याचा संशय पोलिसांना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.