मुंबई

दुसऱ्या दिवशीही लोकलगोंधळ

CD

दुसऱ्या दिवशीही लोकलगोंधळ
दुहेरी ब्लॉकने प्रवाशांना मनस्ताप; अनेक स्थानकांवर प्रचंड गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई/डोंबिवली, ता. २१ ः खर्डी रेल्वे स्थानकातील रात्रीचा लांबलेला ब्लॉक आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी लोकलचा डबा घसरल्यानंतर मंगळवारी सकाळी अचानक घेतलेल्या ब्लॉकमुळे सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही विशेष गाड्या कल्याणहून सोडण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. डोंबिवलीत गर्दी असताना गाड्या कल्याणहून का सोडल्या, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
डोंबिवली स्थानकावर सकाळी ८.०५ ते ८.३५ या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. आधीच विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे फलाट क्रमांक तीन आणि पाचवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवरही हीच परिस्थिती होती. कर्जत, बदलापूर, कल्याण, टिटवाळा, आसनगाव आणि कसारा मार्गावरील गाड्या आधीच भरून येत असल्याने डोंबिवलीतील प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी अक्षरशः झुंजावे लागले. अनेकांना भरगच्च गाड्यांमधून कसाबसा प्रवास करावा लागला, तर काहींना गाड्या सोडून द्याव्या लागल्या. कार्यालयात पोहोचण्यास उशीर होण्याची भीती, लेटमार्कचा दबाव आणि उकाड्यातील गर्दीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
---
रात्रीचा ब्लॉक लांबला
खर्डी स्थानकात सोमवारी रात्री घेतलेला नियोजित ब्लॉक वेळेत पूर्ण झाला नाही. रात्री ११.५० ते २.४५ या वेळेत नियोजित असलेले काम अपूर्ण राहिल्याने ब्लॉक प्रथम ३.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने पुन्हा वाढ करीत पहाटे ४.१७ पर्यंत काम सुरू होते.
----
मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल उशिरा
परिणामी, पहाटेपर्यंत रेल्वेमार्ग उपलब्ध न झाल्याने इगतपुरी आणि कसारादरम्यान सात ते आठ मेल-एक्स्प्रेस गाड्या खोळंबून राहिल्या. या गाड्यांना मार्ग देण्यासाठी सकाळी जलद मार्गावरील लोकल उशिराने धावू लागल्या. त्याचा थेट परिणाम सकाळच्या सत्रातील लोकल सेवांवर झाला.
---
प्रवाशांचा संताप
सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या गोंधळामुळे अनेकांना वेळेत कार्यालय गाठणे कठीण झाले. उशिरा धावणाऱ्या गाड्या, प्रचंड गर्दी आणि अनिश्चित वेळापत्रक यामुळे प्रवाशांचा संयम सुटल्याचे दिसत होते. नियोजनाचा अभाव आणि अचानक निर्णयांमुळेच हा गोंधळ निर्माण होतो, अशी नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
----
रस्तेमार्गावरही कोंडी
विविध रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळल्याने अनेकांनी रस्तेमार्गे ठाणे गाठून मग पुढचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, माणकोली उड्डाणपूल, कल्याण-शिळ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या; मात्र उन्हाचा तडाखा, कल्याण-शिळ रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे अनेकांची गैरसोय झाली.
----
रेल्वेकडून सतत ब्लॉक घेतले जातात; मात्र ढिसाळ नियोजनामुळे त्यानंतरही बिघाड थांबत नाहीत. सलग दोन दिवस प्रवाशांचे हाल होत असतानाही जबाबदारी निश्चित केली जात नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT