मोर्चा मैदानात काढा, रस्ते अडवू नका!
संतापलेल्या महिलेने मंत्र्यांना भररस्त्यात झापले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : भाजपच्या वतीने आज काढण्यात आलेल्या महिला मोर्चामुळे वरळी येथील जांबोरी मैदानाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्र्यांनाच जाब विचारत आपला संताप व्यक्त केला.
जांबोरी मैदानाजवळ मोर्चा पोहोचला असता, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी मंत्री गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्याच वेळी ही महिला तिथे पोहोचली आणि तिने थेट मंत्र्यांनाच फैलावर घेतले. ‘‘तुम्ही भररस्त्यात मोर्चा काढून रस्ता अडवला आहे. मी तासाभरापासून इथे अडकली आहे. मला घरी जाता येत नाही. तुम्हाला मोर्चे काढायचे असतील तर ते मैदानात काढा. रस्ते अडवू नका. इथून चालते व्हा,’’ अशा कडक शब्दांत तिने आपला रोष व्यक्त केला.
महिलेचे रौद्र रूप पाहून महाजन यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून मंत्र्यांनी तिथून काढता पाय घेणेच पसंत केले. पोलिसांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मला समजावण्यापेक्षा आधी येथील वाहतूक कोंडी दूर करा, असा सल्ला तिने पोलिसांना दिला.
---
समाजमाध्यमांवर कौतुक
सुमारे १५-२० मिनिटे या महिलेने आपला संताप व्यक्त केला, ज्यामुळे तेथे उपस्थित असलेले सर्वच जण हतबल झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सामान्यांच्या त्रासाला वाचा फोडणाऱ्या या महिलेचे अनेकांनी कौतुक केले आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर करीत सरकारवर टीका केली असून, त्या महिलेला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.