संपाचा परिणाम रुग्णालयाच्या स्वच्छतेवर!
‘जेजे’त कचऱ्याचे साम्राज्य; शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्य सरकारच्या अखत्यारितील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. मुंबईतील जेजे, सेंट जॉर्ज, कामा आणि जीटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह परिचारिकांनीही संपाला पाठिंबा दिला आहे. संपामुळे रुग्णालयात नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत रुग्ण व नातेवाइकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जेजे रुग्णालयातील वातानुकूलित जनरल सर्जरी पुरुष वॉर्डाचे नुकतेच उद्घाटन झाले; मात्र संपाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कचरापेटीही भरून वाहत असल्याची परिस्थिती सर्वत्र दिसत आहे. संपामुळे नियमित स्वच्छता होत नसल्याने शौचालयातही दुर्गंधी पसरली आहे. अशीच परिस्थिती इतर वाॅर्डमध्ये आणि रुग्णालयांमध्येही आहे. दरम्यान, संपामुळे जेजे रुग्णालयातील अनेक परिचारिका सुट्टीवर आहेत. याविषयी जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय भंडारवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
----
नियोजित शस्त्रक्रिया पुढे
१. कल्याण येथील २४ वर्षीय सुजीत सिंहच्या हाताची शस्त्रक्रिया नियोजित होती. त्यासाठी १० दिवसांपासून त्याला ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया मंगळवारी होणार होती; पण आत ती पुढे ढकलण्यात आली आहे.
२. फर्निचरचे काम करीत असताना दुखापत झाल्याने ४९ वर्षीय विश्वास गांजेकर यांच्या पायाच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे; पण आता त्यांचीही शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे.
३. अकोला येथील ५२ वर्षीय विजय बोंडे यांची गुरुवारी शस्त्रक्रिया होणार होती; मात्र संपामुळे आता लगेच शस्त्रक्रिया होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी आता अकोल्याला परतण्याचा निर्णय घेतला आहे.
......
पालिका डाॅक्टरांचा निषेध
पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनीही महागाई भत्त्यासाठी निषेध व्यक्त केला आहे. बुधवारी दिवसभर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील डाॅक्टरांनी काळी फीत लावून काम केले. महागाई भत्त्याबाबत लवकरच परिपत्रक जाहीर होण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले असले, तरी लेखी आदेश मिळेपर्यंत हे प्रतीकात्मक आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.