वाचकांची संख्या घटली
हुतात्मा चौकातील पुस्तक विक्री केंद्राला अल्प प्रतिसाद
मुंबई, ता. २३ ः पुस्तक दिन गुरुवारी (ता. २३) होता. या पुस्तकदिनी पुस्तक विक्री केंद्रांवर वाचकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हुतात्मा चौकात मागील ६० वर्षांहून अधिक काळ मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील नवीन व जुन्या ग्रंथसंपदेला पुस्तकप्रेमींचे वेळोवेळी प्रेम मिळाले आहे. या वर्षी मात्र त्याच्या उलट परिस्थिती पाहण्यास मिळाली. गुरुवारी काही अपवादात्मक पुस्तकप्रेमींनी पुस्तक खरेदी केल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही तरुण जोडप्यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी मराठी व इंग्रजी साहित्यातील पुस्तकांची खरेदी केली असली तरी हा प्रतिसाद म्हणता तितका चांगला नव्हता, अशी प्रतिक्रिया मागील ३२ वर्षांपेक्षा जास्त काळ येथे पुस्तक विकणाऱ्या राजेंद्र जैस्वाल यांनी दिली. दहा वर्षांपूर्वी पुस्तक खरेदी करण्याचा जो ट्रेंड होता, तो आता पूर्णपणे बदलत चालला आहे. बहुतांश तरुण वाचक वर्ग हा कादंबरी आणि तत्सम साहित्य खरेदी करण्यासाठी कमी दिसतो; मात्र तोच वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक आणि आपल्या आर्थिक प्रगतीसंदर्भातील पुस्तक खरेदी करण्याकडे अधिक दिसतात. एकेकाळी आमच्याकडून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासंदर्भात असंख्य पुस्तके खरेदी केली जात होती, आता ती खरेदी करण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने आमच्याकडे या संदर्भातील मोठा स्टॉक रद्दीसारखा पडून आहे; परंतु दुसरीकडे मेडिकल आणि जेईईसारख्या सामाईक परीक्षा संदर्भातील पुस्तकांची खरेदी मात्र वाढली असल्याचे जैस्वाल सांगतात.
------------
धार्मिक ग्रंथांना मागणी
हुतात्मा चौकातील नारायण बुक स्टॉल नावाने नारायण हे आपले पुस्तकाचे स्टॉल मागील ३८ वर्षांपासून चालवतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धार्मिक ग्रंथाची मागणी करणारे पुस्तकप्रेमी येतात आणि त्यांची मागणी असंख्य वेळा पूर्ण होत असते. अलीकडे भगवद्गीता, रामायणापासून विविध प्रकारचे धार्मिक ग्रंथ यांना मागणी वाढली आहे. अनेकदा सकाळी आलेले पुस्तक संध्याकाळपर्यंत विकले जाते, अशी स्थिती आहे; मात्र पुस्तक दिनाच्या निमित्ताने फार मोठा फरक आम्हाला जाणवला नसल्याचे नारायण यांनी सांगितले.
-----------------------
उन्हाचा फटका
पुस्तक विक्रेते मनोज कुमार आणि राधेश कुमार यादव यांनी इंग्रजीतील विविध ग्रंथसंपदा ही कशी वाचकांना आकर्षित करते, याची अनेक उदाहरणे दिली. यासाठी त्यांनी ॲटॉमिक हॉबिट्स, स्टॉक मार्केटिंग, हाऊ टू मनी स्टॉक, दि गोल्डन रोड आदी अनेक पुस्तके मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात, असे सांगितले. गुरुवारी कडक ऊन असल्याने अनेकांनी संध्याकाळी पुस्तक खरेदी करण्यासाठी पसंती दिली, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.