पाणीटंचाईमुळे शस्त्रक्रिया रखडल्या
मुंबईतील रुग्णालयांत रुग्णसेवेवर परिणाम
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईसह महानगरातील ए, बी, सी, डी, ई आणि एफ दक्षिण या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईमुळे आरोग्य सेवा बाधित झाली आहे. एफ दक्षिण विभागातील अनेक रुग्णालयांतील शस्त्रक्रिया रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांची गैरसाेय झाली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठ्यातील अडचणी, शिवडी येथील मोठ्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम आणि व्हाॅल्व बदलण्याच्या प्रक्रियेमुळे मागील दोन दिवसांपासून (२२ आणि २३ एप्रिल) अनेक भागांत पाणीपुरवठा खंडित झाला. याबाबत पूर्वसूचना देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर बनली आहे.
एफ दक्षिण विभागातील प्रमुख रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालयात पाण्याअभावी शस्त्रक्रिया कक्ष बंद ठेवावे लागले. परिणामी, नियोजित (रूटीन) शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. रुग्णालयात केवळ अतिदक्ष (इमर्जन्सी) शस्त्रक्रियाच मर्यादित स्वरूपात करण्यात आल्या. बुधवारी ८४ मोठ्या, ७८ छोट्या शस्त्रक्रिया आणि १० तपासण्या करण्यात आल्या. एरवी १०० मोठ्या, १०५ छोट्या शस्त्रक्रिया आणि ३६ तपासण्या केल्या जातात.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, एसी व कूलिंग सिस्टीम चालवण्यासाठी तसेच स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. पाणी उपलब्ध नसल्याने उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ऑपरेशन थिएटर सुरू ठेवणे शक्य झाले नाही.
केईएम रुग्णालयात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र रुग्णालयाची दैनंदिन गरज सुमारे दाेन लाख लिटर असताना टँकरमधून मिळणारे पाणी केवळ १० ते १२ हजार लिटरपर्यंत मर्यादित राहते. बुधवारी २० ते २७ टँकर मागवण्यात आले, तरीही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.
नाव न सांगण्याच्या अटीवर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सांगितले, ‘पाणी नसताना शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे. हात धुणे, उपकरणे स्वच्छ ठेवणे आणि निर्जंतुकीकरण या मूलभूत गोष्टींसाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांतील शस्त्रक्रिया थांबवाव्या लागल्या.’ या परिस्थितीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रुग्णांच्या उपचारांत विलंब झाला असून काही रुग्णांना पुन्हा तारीख देण्यात आली आहे.
-------
जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जात आहे. लवकरच परिस्थिती सुधारेल. आता शस्त्रक्रिया कक्षात वातानुकूलित यंत्रणा सुरू करण्यात आली असून आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
--------
रुग्णालयात अंडरग्राउंड टँक व ओव्हरहेड टाक्या उपलब्ध असल्याने पाण्याची समस्या जाणवली नाही. सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय
--
टाटा रुग्णालयात सेवेवर परिणाम नाही
टाटा रुग्णालयात दोन पाणीपुरवठा वाहिन्या असून अतिरिक्त टँकरही मागवण्यात आले. व्यवस्थापकीय इमारतीत किरकोळ अडचण जाणवली; मात्र रुग्णसेवांवर परिणाम झाला नाही, असे टाटा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.