एसआयआर प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवा
काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : आपल्या भागातील मतदार यादी अद्ययावत असेल, काही गैरप्रकार होणार नाहीत, यासाठी निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवर डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, असे आवाहन मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण शिबिरात करण्यात आले आहे.
निवडणूक आयोग सध्या एसआयआर प्रक्रिया राबवत असून, मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याने यासाठी काय केले पाहिजे, यासाठी मुंबई काँग्रेसच्या बीएल ए १ साठी राजीव गांधी भवन येथे एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या राष्ट्रीय वॉर रूमचे प्रमुख प्रो. सौरभ वाजपेयी, कायदेविषयक विभागाचे प्रमुख ॲड. निशांत मंडल, मुंबईचे प्रभारी राजेश कुमार यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
एसआयआर प्रक्रियेतून सत्ताधारी भाजपाला मदत होईल अशा प्रकारे काम होत असल्याचे देशातील अनेक भागांतील एसआयआर प्रक्रियेत दिसून आले आहे. लाखो मतदारांची नावे वगळली जात आहेत. मुंबईतही ही प्रक्रिया सुरू होत असून, आपल्या भागात मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रियेत संबंधित कार्यकर्त्याने सक्रिय भाग घेतला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. मुंबई काँग्रेस जिल्हास्तरीय, विधानसभानिहाय आणि ब्लॉक स्तरावरही प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.