गिल्बर्ट हिल येथील १०१ एकर क्षेत्रफळ होणार विकसित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत १९ मोठे समूह पुनर्विकास प्रकल्प मुंबई महापालिका एसआरएच्या माध्यमातून राबविणार असून, त्याचाच एक भाग म्हणून अंधेरी गिल्बर्ट हिल येथील १०१ एकर भूखंडाचा समूह विकास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या प्रकल्पाला धारावी पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे सवलती मिळाव्यात, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.
मुंबई शहरातील झोपडपट्टी व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये महापालिकेमार्फत व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत राबविण्यात येणारे पुनर्विकास प्रकल्प हे वेगवेगळ्या नियमांनुसार कार्यान्वित होतात. राज्य शासनाच्या ११ नोव्हेंबर २०२५च्या शासन निर्णयानुसार, संपूर्ण मुंबई शहरात १९ मोठ्या समूह पुनर्विकास प्रकल्पांसह अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल परिसरात सुमारे १०१ एकर क्षेत्राचा समावेश असलेली समूह पुनर्विकास योजना प्रस्तावित असून, या प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ही नोडल एजन्सी राहून हे प्रकल्प निविदा प्रक्रियेद्वारे राबविण्यात येणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेवासुविधा या विशेष स्वरूपाच्या असून, या प्रकल्पात १ जानेवारी २००० पूर्वीच्या रहिवाशांना ३५० चौ. फुटाचे मोफत घर, २००० ते २०११ या दरम्यानच्या रहिवाशांना ३०० चौ. फुटाचे सवलतीत घर, त्यानंतरच्या रहिवाशांना भाडे, व्यावसायिक गाळेधारक आणि वरच्या मजल्यावरील रहिवाशांसाठी विशेष तरतुदीसहित एकात्मिक पायाभूत सुविधा, नियोजन, स्वतंत्र रस्ते, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सुविधा असे मॉडेल मुंबईत राबविण्यात येणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन मुंबई शहरातील १६ समूह पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना धारावी पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणेच अंधेरीतील भूखंडाच्या क्षेत्रफळाचे मोफत सवलतीत घर, भाडे आधारित योजना आणि व्यावसायिक गाळेधारक व वरच्या मजल्यावरील रहिवाशांसाठी विशेष सुविधा इत्यादी सोयीसुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक मेहेर हैदर यांनी केली आहे. त्यांच्या ठरावाच्या सूचनेला पालिका सभागृहात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.