लेखी परीक्षांसह मुलाखतीलाही डमी
सरकारी विमा कंपनीतील प्रकार; अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
मुंबई, ता. ६ : न्यू इंडिया अश्योरन्स या सरकारी क्षेत्रातील विमा कंपनीच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षांसह मुलाखतीत डमी बसवून अनेक उमेदवारांनी नोकरी मिळवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी दोन वर्षांत २० लाखांहून अधिक पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कंपनीने कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली असून गुन्हा दाखल झाला आहे.
कंपनीच्या तक्रारीनुसार मूळचा बिहारचा रहिवासी चंदन कुमार या उमेदवाराने प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांत राबविलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झाला. त्यास एप्रिल २०२४ पासून प्रशासकीय अधिकारीपदावर नियुक्त केले गेले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनी मुख्यालयास आलेल्या ईमेलद्वारे या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला हाेता. चंदन कुमार आणि इतर उमेदवारांनी परीक्षांसह मुलाखतीस डमी व्यक्ती बसवल्याची नेमकी माहिती नमूद होती. या ईमेलची गंभीर दखल घेऊन कंपनीने खासगी तपास यंत्रणेमार्फत तपास केला. त्यात ईमेलद्वारे करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य आढळले.
जानेवारीत कंपनीच्या विभागीय कार्यालयाने चंदन कुमारचे भरती प्रक्रियेवेळी घेतलेले आणि नियुक्तीनंतर घेतलेले बायोमेट्रिक हजेरीसाठी आवश्यक तपशील (बोटांचे ठसे) जुळवून पाहिले. ते न जुळल्याने चंदन कुमारला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.