मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर
‘सॅप’ प्रणालीद्वारे निधी तत्काळ उपलब्ध; प्रशासनाची तत्पर कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी महापालिका सभागृहात सुधारणांसह मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, मंजुरी मिळताच प्रशासनाने विलंब न लावता नगरसेवकांच्या विकासकामांचा निधी ‘सॅप’ प्रणालीवर तत्काळ उपलब्ध करून दिला आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे मुंबईतील नागरी सुविधा आणि स्थानिक विकासकामांना मोठी गती मिळणार आहे.
यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुका आणि त्यानंतरची महापौर, उपमहापौर व समित्यांची निवड प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प मंजुरीस दरवर्षीपेक्षा अधिक कालावधी लागला. ही बाब लक्षात घेऊन, विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सुधारित अर्थसंकल्प तत्काळ प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.
आयुक्तांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अभिजित बांगर आणि सहआयुक्त (वित्त) देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागाने काल रात्री उशिरापर्यंत काम करून हा अर्थसंकल्प ‘सॅप’वर उपलब्ध करून दिला. यामुळे आता विविध विभागांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करता येणार आहे.
कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा
प्रशासनाने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी समाधान व्यक्त केले आहे. २५ फेब्रुवारीला सादर झालेल्या या अर्थसंकल्पावर प्रदीर्घ चर्चेनंतर काल खर्चाच्या बाजूला अंतिम मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे रस्ते, पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित प्रलंबित स्थानिक कामे आता पावसाळ्यापूर्वी किंवा तातडीने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.