प्रवाशाकडून तिकीट तपासनीसाला मारहाण
एलटीटी रेल्वे स्थानकातील प्रकार; तरुणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कामायनी एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून तिकीट तपासनीसाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ८) घडली. दंडाची कारवाई करण्यास विरोध करत संबंधित प्रवाशाने टीसीच्या डोक्यात ठोसे मारत धक्काबुक्की केल्याची तक्रार रेल्वे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
अमित गणेश कोळी (वय ४२) हे सीएसएमटी येथे तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी ते एलटीटी येथे तिकीट तपासणीच्या ड्युटीवर होते. दुपारी फलाट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या ट्रेन क्रमांक ११०७१ कामायनी एक्स्प्रेसच्या एस-९ बोगीत तपासणी करीत असताना एका तरुणाकडे तिकीट नसल्याचे आढळले. आईला सोडण्यासाठी आलो होतो, असे संबंधित तरुणाने सांगितले. त्यानंतर कोळी यांनी प्लॅटफॉर्म तिकिटाची विचारणा केली असता त्याच्याकडे तेही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नियमानुसार दंड भरावा लागेल, असे सांगितल्यावर तो संतापला. दहा मिनिटांसाठी कसले तिकीट, असे म्हणत त्याने दंड भरण्यास नकार दिला.
वादातून मारहाण
वाद वाढत असताना संबंधित तरुणाने कोळी यांच्या डोक्यात ठोसे मारून धक्काबुक्की केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेनंतर बोगीतील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. कोळी यांनी कंट्रोलला फोन करून मदत मागितली. गाडी ठाणे स्थानकात पोहोचल्यानंतर आरपीएफ जवानांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले.
आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर
आरोपीचे नाव राज कमलेंद्र चंद्रसेवक तिवारी (वय २५, रा. मोशी, पुणे) असे असून तो खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.