डॉक्टरांसाठी ‘नोकरी शोध’ आता डिजिटल
आयएमएने सुरू केले करिअर ब्युरो; देश-विदेशातील ‘व्हेरिफाईड’ नोकऱ्या आता एका क्लिकवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर आता डॉक्टरांच्या रोजगार प्रक्रियेतही स्पष्टपणे दिसू लागला आहे. रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि तरुण डॉक्टर यांच्यातील दरी कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने ‘एम्प्लॉईमेंट अँड करिअर फॅसिलिटेशन ब्युरो हा नवा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून देशासह विदेशातील पडताळणी केलेल्या नोकऱ्यांची माहिती आता एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
आयएमए एम्प्लॉईमेंट ब्युरो कमिटी आणि आयएमए ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाढत्या खासगी रुग्णालयांचे जाळे, ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता, विदेशातील वाढत्या संधी आणि डिजिटल भरती प्रक्रियेची गरज लक्षात घेऊन हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत डॉक्टरांच्या भरतीसाठी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप आणि अनधिकृत एजन्सींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत होते. अनेकदा चुकीची माहिती, कमी वेतन किंवा फसवणुकीच्या तक्रारीही समोर येत होत्या. अशा पार्श्वभूमीवर ‘व्हेरिफाईड जॉब्स’ हा या पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जात असल्याचे मत एका डॉक्टरने मांडलं. दरम्यान, डिजिटल युगात आता डॉक्टर नोकरी शोधणार नाहीत, तर नोकरी डॉक्टरांपर्यंत पोहोचणार असा बदल आरोग्य क्षेत्रात दिसू लागल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे. तरुण डॉक्टरांसाठी करिअर मार्गदर्शन, रोजगार संधी आणि विश्वासार्ह भरती प्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आयएमएचा हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मोफत सुविधा
विशेष म्हणजे हा पोर्टल सर्व डॉक्टरांसाठी मोफत खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एमबीबीएस, पदव्युत्तर शिक्षण किंवा सुपर स्पेशालिटी पूर्ण केलेल्या तरुण डॉक्टरांना योग्य नोकरी शोधण्यासाठी होणारी धावपळ, ओळखींचा आधार किंवा अपारदर्शक भरती प्रक्रियेवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.