मराठीला विरोध म्हणून पाहू नका
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे चालकांना आवाहन
मुंबई, ता. १० : ‘महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे, मराठीला विरोध म्हणून पाहू नका; ती आपुलकीची भाषा म्हणून स्वीकारा.’ असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (ता. ९) चालकांना केले. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या ‘वर्धापनदिन व जल्लोष मेळावा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘हिंदी भाषिक चालकांना स्वयंस्फूर्तीने मराठी शिकवण्यासाठी हाजी अराफत शेख यांनी केलेला अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीने चालक स्वतःहून पुढे येत असतील, तर शासनदेखील त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. चालक बांधवांनी मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. शासनाने त्यांना तब्बल १०५ दिवसांची मुदत दिली आहे; मात्र या कालावधीत जर त्यांनी किमान ‘व्यावहारिक मराठी’ आत्मसात केली नाही, तर १६ ऑगस्टपासून त्यांच्यावर कारवाई करणे अटळ ठरेल,’ असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रकचालकांच्या योगदानाचा उल्लेख करत मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, व्यावसायिक वाहनचालक हा केवळ चालक नसून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देणारा खरा शिल्पकार आहे. वाहतूक क्षेत्र हे समाजाशी थेट जोडलेले असल्याने चालकांचे बोलणे, वर्तन आणि भाषा यावर संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा अवलंबून असते, प्रवासी वाहनात बसल्यानंतर त्याला आपल्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे’, ‘किती भाडे होईल’ एवढे तरी व्यावहारिक मराठी प्रत्येक चालकाला आले पाहिजे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा व टॅक्सीचालक उपस्थित होते.
परराज्यातून महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांचे स्वागत करतानाच, स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल, गैरसमज कमी होतील आणि सेवा अधिक सुसंस्कृत बनेल, ‘मी मराठी, तू मराठी, मराठी आमचा स्वाभिमान’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.