लष्कराच्या नावाने कंपनीला २१ लाखांचा गंडा
मुंबई, ता. १० : भारतीय लष्कराच्या नावे शहरातील रसायनांचा पुरवठा करणाऱ्या शहरातील कंपनीला २० लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात (मध्य विभाग) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात भामट्यांनी भारतीय लष्कर, हवाई दलाच्या नावे जीएसटी नोंदणी केल्याचे उघड झाले.
कंपनीच्या लेखा विभागात भामट्यांनी संपर्क साधून स्वतःला भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. कलिना येथील तळावर जलशुद्धीकरणासाठी वापर होणाऱ्या रसायनाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सोबत संरक्षण मंत्रालयाचे बोधचिन्ह असलेले मागणीपत्र आणि जीएसटी क्रमांक पाठवला. कंपनीने खातरजमा केली तेव्हा जीएसटी क्रमांक बरोबर होता. त्यामुळे कंपनी अधिकाऱ्यांना विश्वास बसला.
रसायनाचे ४.१६ लाख रुपयांचे कोटेशन कंपनीने भामट्यांना पाठवले. भामट्यांनी रक्कम जमा करण्यासाठी कंपनीचे बँक तपशील मागून घेतले. कंपनी खात्यावर सुरुवातीला पाच रुपये पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर भामट्यांनी लष्करी प्रक्रिया म्हणून कंपनीलाच एका खात्यावर ४.१६ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम आपोआप कंपनी खात्यावर जमा होईल, असे पटवून दिले. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लष्कराचे खाते समजून त्यावर जमा केली. या व्यवहारात त्रुटी राहिल्याने रक्कम खात्यावर जमा झालेली नाही, असे भामट्यांनी सांगितले. अशा प्रकारे भामट्यांनी कंपनीकडून २० लाख ८८ हजार रुपये उकळले. ही रक्कम खात्यावर जमा न झाल्याने कंपनी अधिकाऱ्यांनी लष्करी अधिकारी भासवणाऱ्या भामट्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे फोन बंद होते. गुगलद्वारे शोधाशोध केली असता लष्करी अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी केलेल्या फसवणुकीची प्रकरणे उघड झाली. त्यानंतर कंपनी अधिकाऱ्यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.