वाढत्या तापमानामुळे गर्भवती महिलांच्या त्रासात वाढ
निर्जलीकरणाच्या तक्रारीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने गर्भवती महिलांमध्ये निर्जलीकरणाच्या प्रकरणांत वाढ होत आहे. तीव्र उन्हामुळे अनेक गर्भवती महिलांमध्ये गरगरणे, उलटी होणे, बेशुद्ध पडण्याचे प्रकार वाढले आहे. गर्भधारणेदरम्यान निर्जलीकरण झाल्यास महिलांना अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवू शकते, तसेच काही प्रकरणांमध्ये त्वरित उपचारांची गरज भासते, यामुळे अशा वेळी आवश्यक काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
कमी पाणी पिणे आणि शरीरातील द्रवपदार्थ कमी होणे, यामुळे महिलांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गर्भवती महिलांपैकी अनेकांना निर्जलीकरण, तर काहींना युटीआय संसर्गाचा त्रास आढळून येत आहे. स्तनपान करणाऱ्या मातांमध्येही डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या तक्रारी वाढल्या असून, यामागे शरीरातील पाण्याची कमतरता कारणीभूत ठरू शकते, असे प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ म्हणाल्या. या काळात शरीराला अधिक द्रवांची गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे, जास्त वेळ उन्हात राहणे टाळावे आणि थंड व आरामदायी वातावरणात राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. लहान मुलांमध्येदेखील निर्जलीकरण, त्वचेच्या समस्या आणि संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.
मधुमेहींनादेखील धोका
वाढलेल्या तापमानामुळे मधुमेहींमध्ये बुरशीजन्य (फंगल) संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास बुरशीसाठी पोषक वातावरण निर्माण करते, ज्यामुळे त्वचा, नखे आणि जननेंद्रियांच्या भागात संसर्ग पसरु शकतो. उष्ण आणि दमट हवामानामुळे घाम अधिक येतो, त्वचा ओलसर राहते आणि बुरशीच्या वाढीस पोषक स्थिती तयार होते. मधुमेहामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही सामान्य व्यक्तीच्या तुलनेने कमी असते. त्यामुळे संसर्गाशी लढण्याची क्षमता घटते आणि अगदी किरकोळ वाटणारा संसर्गही वेगाने वाढू शकतो.
डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
अनेकदा त्वचेवर खाज येणे, लालसरपणा, जळजळ किंवा पांढरे डाग दिसू लागतात, जी फंगल इन्फेक्शनशी संबंधीत लक्षणे असू शकतात. त्यामुळे या कालावधीत मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवणे, सैल आणि सूती कपडे वापरणे, तसेच कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. मनीषा भट्ट यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.