महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाहिरातबाजीचे ग्रहण
आवाज फाउंडेशनचा राज्य सरकारला इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जाहिरात प्रदर्शनासाठी तयार केलेल्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड (जाहिरातींचे प्रदर्शन नियमन) नियमावली २०२६ ला पर्यावरण क्षेत्रातून तीव्र विरोध सुरू झाला आहे. या नियमावलीमुळे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचे नुकसान होईल आणि प्रकाश प्रदूषणाचा (लाइट प्रदूषण) धोका निर्माण होईल, असा इशारा आवाज फाउंडेशनच्या संस्थापिका सुमयरा अब्दुलअली यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
मेरिटाइम बोर्डाच्या नवीन नियमांनुसार, समुद्रकिनाऱ्यांवर होर्डिंग, एलईडी डिस्प्ले, लेझर शो आणि अगदी हवेत तरंगणाऱ्या फुग्यांद्वारे जाहिरातींना परवानगी दिली जाणार आहे. सुमयरा अब्दुलअली यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राची किनारपट्टी ही नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे. ताडोबासारख्या राष्ट्रीय उद्यानांप्रमाणेच या किनारपट्टीचे रक्षण करणे गरजेचे आहे. जाहिरातींच्या झगमगाटामुळे येथील खारफुटीची जंगले, स्थलांतरित पक्षी आणि जैवविविधतेवर अत्यंत वाईट परिणाम होईल.
जाहिरातींच्या डिजिटल बोर्डमुळे होणाऱ्या प्रकाश प्रदूषणाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे झोपण्याच्या पद्धतीत व्यत्यय येऊन तणाव आणि डोळ्यांचे आजार वाढू शकतात. महामार्गालगत किंवा किनाऱ्यांजवळ असणाऱ्या तीव्र प्रकाशझोतामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यताही आवाज फाउंडेशनने वर्तवली आहे. न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या शहरांमध्येही अशा जाहिरातींवर कडक निर्बंध असल्याचे उदाहरण पत्रात देण्यात आले आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
समुद्रकिनाऱ्यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी जाहिरातींवर पूर्ण बंदी घालावी.
व्हिडिओ आणि ॲनिमेशन असलेल्या जाहिरातींना परवानगी देऊ नये.
डिजिटल बोर्डच्या प्रकाशाची तीव्रता निश्चित करावी.
या नियमावलीवर नागरिकांच्या सूचना आणि हरकती ऐकण्यासाठी सार्वजनिक सुनावणी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.