गोराईतील देशाच्या पहिल्या कांदळवन उद्यानाला अटलजींचे नाव
३३ कोटींचा प्रकल्प; आठ हेक्टरवर निसर्गाचा खजिना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण कांदळवन उद्यानाला माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. तब्बल आठ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिनाअखेरपर्यंत ते पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी या उद्यानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडला होता. या प्रस्तावाला वनविभागाच्या ‘मॅन्ग्रोव्ह सेल’ने नुकतीच मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने २०२० मध्ये गोराईतील डम्पिंग ग्राउंडच्या जागी विकसित केलेल्या ‘अटल स्मृती उद्याना’नंतर आता हे कांदळवन उद्यानही वाजपेयींच्या नावाने ओळखले जाईल. कांदळवन परिसंस्थेचा पर्यटकांना जवळून अनुभव घेता यावा, यासाठी ३३.४३ कोटी रुपये खर्चून हे उद्यान साकारण्यात आले आहे. यामध्ये ७५० मीटर लांबीचा लाकडी ‘वॉक-वे’ तयार करण्यात आला आहे. या मार्गाच्या शेवटी खाडीचे सौंदर्य पाहण्यासाठी एक विशेष डेक उभारण्यात आला आहे.
----------------
निसर्ग परिचय केंद्र
पक्षीप्रेमींसाठी येथे १८ मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे. येथून परिसरातील विविध पक्षी आणि विस्तीर्ण खाडी क्षेत्राचे विहंगम दृश्य पाहता येईल. याशिवाय, दोन मजली ‘निसर्ग परिचय केंद्र’ उभारले असून, तिथे ग्रंथालय आणि माहिती फलकांच्या माध्यमातून कांदळवनातील जैवविविधतेचा अभ्यास करता येईल.
------------
सौरऊर्जेचा वापर
या उद्यानाचे काम २०२१ मध्ये सुरू झाले होते. तांत्रिक कारणांमुळे उद्घाटनाच्या तारखा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या; मात्र आता किरकोळ कामे शिल्लक असून मे महिन्याच्या अखेरीस हे पर्यटन केंद्र मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे पर्यटकांच्या सुविधेसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात आला असून, रूफटॉप रेस्टॉरंट आणि निसर्ग संकल्पनेवर आधारित भेटवस्तूंचे दुकानही आकर्षण ठरणार आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.