‘सोल डेव्हलपमेंट’ काळाची गरज
राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : ‘‘आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ तांत्रिक कौशल्ये पुरेशी नाहीत. मशीन माणसाला स्मार्ट बनवू शकतात, पण संवेदनशीलता, नैतिकता आणि भारतीय जीवनमूल्ये केवळ ‘कल्चरल इंटेलिजन्स’ (सांस्कृतिक बुद्धिमत्ता) द्वारेच साध्य करता येतात. तरुणांनी तंत्रज्ञानात आधुनिक आणि आत्म्याने भारतीय बनावे,’’ असे प्रतिपादन राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी मुंबईत केले.
विश्व सिंधी हिंदू फाउंडेशन ऑफ एसोसिएशन्सतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘जनरल बॉडी मीटिंग’ आणि ‘युवा संमेलनात’ ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी सिंधी समाजाची एकता आणि युवा सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला.
तरुणांना उद्देशून बोलताना देवनानी म्हणाले की, प्रोफेशनल ट्रेनिंग आणि डिजिटल स्किल्ससोबतच चारित्र्यनिर्मिती, आध्यात्मिक विकास आणि सकारात्मक विचार (सोल डेव्हलपमेंट) महत्त्वाचे आहे. ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांचा त्रिवेणी संगमच ‘विकसित भारत २०४७’चा आधारस्तंभ ठरेल. तरुणांनी रामायण आणि गीतेचा अभ्यास करावा. कारण त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनमूल्ये दोन्ही दडलेली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
जातिवाद आणि क्षेत्रवादाच्या पलीकडे जाऊन तरुणांनी ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जोपासावी. राजकारणात सक्रिय होताना मूल्य आधारित राजकारणाची कास धरण्याचे त्यांनी सुचवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आयुष्मान भारत आणि स्टार्टअप इंडियासारख्या योजनांनी सिंधी समुदायाला मोठी ताकद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
जॅकी श्रॉफ यांच्यासोबत रंगला संवाद
या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. संवादादरम्यान देवनानी यांनी जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल विचारले असता, ‘‘मी देश हिरवागार (वृक्षारोपण) करत आहे,’’ असे उत्तर जॅकी यांनी दिले. या प्रेरक संवादाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
या महाअधिवेशनाला खासदार शंकर लालवानी, डॉ. गुरमुख जगवानी, डॉ. राजू मनवानी, रमेश तौरानी, पलक मुच्छाल, मिथुन, रेमो डिसूझा आणि सिंधी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप ‘जिये सिंध, वदे हिंद’ या जयघोषाने झाला. मान्यवरांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थितांचा गौरव करण्यात आला.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.