आंबा-काजू उत्पादकांची
पाेलिसांकडून नाकाबंदी
गिरगाव चाैपाटीवरच मोर्चा रोखला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १५) गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ असा मोर्चा काढण्यात येणार हाेता. या पार्श्वभूमीवर या परिसरात प्रचंड पाेलिस फाैजफाटा तैनात करण्यात आला हाेता. मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी चौपाटीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून आंदाेलकांची नाकाबंदी केली हाेती. शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांची धरपकड करून आंदाेलन माेडून काढले.
मोर्चाची घोषणा १५ दिवसांपूर्वी करण्यात आली होती. पोलिसांनी मोर्चा काढू नये, यासाठी राजू शेट्टी तसेच आंबा बागायतदार उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही शेतकरी संघटनांनी मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे सकाळपासूनच गिरगाव चौपाटी, वर्षा बंगला आणि रामगिरी बंगल्याच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आंदोलक गिरगाव चौपाटीवर जमा होऊ लागले. मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी चौपाटीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करून नाकाबंदी केली. आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडवून थेट पोलिसांच्या वाहनांत बसवण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या शेतकरी नेत्यांना डोंगरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तर इतर आंदोलकांना मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत हलविण्यात आले. शेतकरी संघटनांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
शाब्दिक चकमक
शिवसेना ठाकरे गटाचे मंत्रालय परिसरातील कार्यालय ‘शिवालय’ येथे नेते व पोलिसांत शाब्दिक चकमक झडली. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा आग्रह धरला, तर पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही वेळ तणावपूर्ण वातावरण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, विनायक राऊत, महादेव जानकर आदी नेत्यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान महादेव जानकर यांच्या पायाला दुखापत झाली. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे जानकर यांनी सांगितले.
हे सहभागी झाले
शिवसेना (ठाकरे गट) नेते विनायक राऊत, अरविंद सावंत, महादेव जानकर, प्रकाश रेड्डी, मराठी भाषा समितीचे दीपक पवार हे मोर्चात सहभागी झाले होते.
----
दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. मुख्यमंत्री कोकणात आले; पण निवेदनही स्वीकारले नाही. ५० वर्षांत प्रथमच कोकणातील शेतकरी मुंबईत आला; पण त्यांच्या वेदना समजून न घेता पोलिसांनी ताब्यात घेतले.
- राजू शेट्टी, शेतकरी नेते
-------
पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. कोकणातील शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत पडेपर्यंत हा लढा थांबणार नाही.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.