दुचाकीस्वारांनो पावसाळ्यात सावध राहा!
खड्डे, घसरडे रस्ते आणि कमी दृश्यमानतेमुळे अपघातांची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः पावसाळा सुरू झाला असून, रस्त्यावरील खड्डे वाढत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवताना होणारे वाहनांचे बिघाड आणि अपघात या समस्यांना मुंबईकरांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात योग्यरीतीने काळजी घेतल्यास वाहनचालकांना यातून दिलासा मिळू शकतो.
गेल्या १५ वर्षांत मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाले असून, त्यात हजारो प्रवाशांचा जीव गेला आहे. दरवर्षी जून-जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडताच मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा होते. चेंबूर ते सीएसएमटी, बांदे ते दहिसर, कुर्ला ते ठाणे या मुख्य रस्त्यांसह लालबहादूर शास्त्री मार्ग, शहरातील अंतर्गत जोडरस्ते, गल्ल्या आणि स्थानिक भागातील छोटे-मोठे रस्ते खड्ड्यांनी व्यापले जातात. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात होतात. दुचाकीस्वारांना तर जीव धोक्यात घालून गाडी चालवावी लागते. दरवर्षी महापालिका आणि इतर सरकारी यंत्रणा रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या निधीची कामे घेतात. पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत, पाणी तुंबणार नाही असे आश्वासन दिले जाते, तरीही पावसाळ्यात खड्डे व पाणी साचण्यापासून मुंबईकर मुक्त होत नाहीत.
दुचाकीस्वारांनो सांभाळा
पावसाळा सर्वांना आवडतो. विशेषतः अनेक जण दुचाकींवर सैर करतात. पावसाळ्यात रस्त्याचा पृष्ठभाग पातळ होतो. त्यामुळे पावसात मोटार चालवणे सोपे नसते; दुर्लक्ष केल्यास किरकोळ ते गंभीर अपघात होतात. पावसाळ्यात जास्त अपघात दुचाकींशी संबंधित असतात.
रस्त्यात खड्डे होण्याची कारणे म्हणजे रस्ते बांधताना वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे साहित्य, रस्ते सुरक्षा ऑडिटचा अभाव आणि नियमित रस्त्याची देखभाल न करणे आहे. सातत्याने होणारी वाहतूककोंडी, पाणी साचणे आणि सदोष सांडपाणी व्यवस्था यांमुळेही रस्त्यांना खड्डे पडतात. त्यामुळे रस्ते अपघात होऊन अनेकांचा बळी जातो.
- पीयूष तिवारी, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन
वेळेवर सर्व्हिसिंग करा
पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी वेळेवर सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. दृश्यमानता कमी असल्याने हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर तपासा, वायपर बघा, गाडीचे ब्रेक नीट आहेत का ते तपासणे गरजेचे आहे. टायरचे हवामध्ये दाब, ट्रेड डेप्थ आणि स्टेपनी तपासा. पुढील वाहन आणि स्वतःच्या वाहनामध्ये योग्य अंतर ठेवा.
- भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त
वाहन हळू चालवा
खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या पावसाळ्यात वाढते. पावसामुळे अनेकदा ब्रेक स्किड होतात; त्यामुळे वाहन हळू चालवा. टायर चांगल्या स्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा ब्रेक लावल्यावर वाहन घसरू शकते. टायर खराब असल्यास अपघाताचा धोका वाढतो. पावसाळ्यात ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा जास्त अपघात होतात; त्यामुळे वाहनचालकांनी अधिक काळजी घ्यावी.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.