खरेदीमुळे निर्देशांकात उसळी
सेन्सेक्समध्ये ७९० अंशांनी वाढ
मुंबई, ता. २४ : काल मोठी घसरण दाखवलेल्या भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी बुधवारी (ता. २४) एक टक्क्यांच्या आसपास वाढ दाखवली. सेन्सेक्स ७९०.५४ तर निफ्टी १९७.५५ अंशांनी वाढला.
आयटी आणि बँका, वित्तसंस्थांच्या शेअरमध्ये झालेली मोठी खरेदी आणि परदेशी वित्तसंस्थांनी बड्या शेअरची केलेली खरेदी यामुळे निर्देशांक सुधारले. आज निफ्टी २४ हजारांच्यावर बंद झाला, तर सेन्सेक्स ७७ हजारांच्या अगदी जवळ जाऊन बंद झाला. निर्देशांकांची वाटचाल दिवसभर नफा दाखवीत होती. दुपारी सेन्सेक्सने ७७ हजारांना स्पर्शही केला होता. नंतर तो तेथून किंचित खाली घसरला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ७६,९९१.२२ अंशांवर तर निफ्टी २४,०२१.६५ अंशावर बंद झाला. परदेशी वित्तसंस्थांच्या खरेदीमुळेही बाजाराला बळ मिळाले. काल परदेशी वित्तसंस्थांनी जवळपास १८ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आज वाहननिर्मिती, ऊर्जानिर्मिती, धातूनिर्मिती ही क्षेत्रे वगळता अन्य सर्व क्षेत्रे तेजीत होती. बांधकाम व्यवसाय, आयटी हे निर्देशांक प्रत्येकी दोन टक्के वाढले. तर बँक निफ्टीही पावणेदोन टक्के वाढला. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने एचपीसीएल, बीपीसीएल, इंडिगो हे कच्च्या तेलाशी संबंधित शेअरचे भाव वाढले.
सेन्सेक्समध्ये आज इंडिगो पावणे पाच टक्के तर टेक महिंद्र आणि ट्रेंट तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस या शेअरचे भाव दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. अदाणी पोर्ट, ॲक्सिस बँक या शेअरचे भावही वाढले. दुसरीकडे एनटीपीसी दोन टक्के घसरला. टाटा स्टील, मारुती, बीईल, एअरटेल एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले.
.....
कच्च्या तेलाच्या दरात घसरण
होर्मुझच्या आखातातून भारताची ११ जहाजे सुरक्षितरीत्या मार्गस्थ झाल्याच्या बातमीमुळे तसेच कच्च्या तेलाचे दरही घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यातच भारत अमेरिका यांच्यात व्यापार करार लवकरच होईल, या अपेक्षेत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. परदेशी ठेवींसंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या स्पष्ट नियमांमुळे खासगी बँकांच्या शेअरची खरेदी झाली. ‘एआय’च्या लाटेतही आयटी क्षेत्राची उपयुक्तता कायम राहण्याचे मत व्यक्त झाल्यामुळे आयटी शेअरचीही खरेदी झाली.
.....
होर्मुझमधून वाहतूक सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले. त्यामुळे आशियाई शेअर बाजार तेजीत होते. तसेच भारत अमेरिका व्यापार करार होण्याच्या अपेक्षेत आज तेजी आली.
- विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.