संवादातून आंदोलने मागे घेण्यात यश!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महायुती सरकारने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारत गेल्या तीन दिवसांत परिवहन विभागाशी संबंधित सलग तीन मोठी आंदोलने मागे घेण्यात यश मिळविले आहे. बेस्ट कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि परिवहन (आरटीओ) विभागातील कर्मचाऱ्यांशी सकारात्मक चर्चेद्वारे त्यांच्या न्याय्य मागण्यांवर निर्णय घेण्यात आल्याने शासन आणि कर्मचाऱ्यांतील विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात दिली.
सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधण्यात आला. त्यांच्या समस्या समजून घेत शक्य त्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता होती. शासनाने लगेच संवेदनशील भूमिका घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला. त्यानंतर आरटीओ कर्मचारी संघटनेने आपला बेमुदत संप मागे घेतला असून, परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
----
आमचे सरकार संघर्ष निर्माण करणारे नाही, तर संघर्ष मिटविणारे सरकार आहे. कर्मचारी हा शासनाचा कणा असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांवर नियमांच्या चौकटीत सकारात्मक निर्णय घेणे, विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे आणि परिवहन विभागाला अधिक सक्षम, कार्यक्षम व जनाभिमुख बनविणे, हीच आमची भूमिका आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.