मुंबईतील चार हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
झुरळांचा प्रादुर्भाव; अस्वच्छ अन्नसाठवणूक उघड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : शहरातील चार अन्न आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या परवाने अथवा नोंदणी निलंबित केली. कलिना येथील विद्यानगरी कॅम्पसमधील मे. अक्षय कटसा, गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर, बीकेसीमधील क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि., जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, दादर गोखले रोडवरील इंड्रो हॉटेल अँड रेस्टॉरंट आणि चेंबूर येथील टिळकनगरमधील भगवती स्टोअर्स, राधिका रेसिडेन्सी यांचा यात समावेश आहे.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत धडक तपासणी मोहीम राबविली. २५ आणि २७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या तपासणीत शहरातील चार अन्न आस्थापनांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने त्यांचे परवाने नोंदणी तत्काळ निलंबित करण्यात आली. स्वयंपाकघरात झुरळे व किड्यांचा प्रादुर्भाव, वारंवार वापरल्याने काळवंडलेले आणि खराब झालेले खाद्यतेल, गंजलेली भांडी, अस्वच्छ ठिकाणी अन्नाची साठवणूक तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी एकच जागा व उपकरणांचा वापर होत असल्याचे तपासणीत आढळले. तपासणीमध्ये खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग व अजिनोमोटोचा अतिवापर, स्वयंपाकासाठी वारंवार वापरल्याने काळवंडलेले आणि अतिप्रमाणात ऑक्सिडीकरण झालेले तेल, स्वयंपाकघर व साठवणुकीच्या ठिकाणी झुरळे आणि किड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला. काही ठिकाणी शिजवलेला भात उघड्यावर आणि झाकणाविना जिन्याखालील अस्वच्छ जागेत ठेवलेला होता. परिसरातील भिंती ओलसर असून बुरशीची वाढ, ओलावा आणि पाण्याचे संघनन आढळले. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी, उपकरणे आणि चाकू गंजलेले व अस्वच्छ होते. त्यावर चरबी, धूळ आणि सेंद्रिय घाण साचलेली आढळली.
सात हजार किलो खाद्यतेल जप्त
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. २५ आणि २७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईत अकोल्यातील दोन तेल व्यावसायिकांकडून तब्बल सात हजार २६.८ किलो खाद्यतेल, ११ लाख ८२ हजार ६५० रुपये किमतीचे जप्त करण्यात आले. गंभीर त्रुटी आढळल्याने दोन्ही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. अकोला येथील एमआयडीसी परिसरातील मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण ही पेढी तसेच मे. भारतकुमार अँड ब्रदर्स, एमआयडीसी, अकोला या पेढीवर ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.