टिळकांनी रुजविलेला उत्सव, मोरे कुटुंबाने जपलेली मूर्तीसेवा
केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवाला १३५ वर्षे
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : गिरगावातील केशवजी नाईक चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १३५ वे वर्षे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांनी मुंबईत सुरू केलेला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी या गणरायाची ओळख आहे. या गणपतीची मूर्ती साकारण्याची परंपराही गिरगावातील मोरे कुटुंबीयांनी पिढ्यान्पिढ्या म्हणजेच १३५ वर्षांपासून जपली आहे.
ब्रिटिश राजवटीच्या काळात गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन टिळकांनी समाजाला एका व्यासपीठावर आणण्याचे काम केले. त्यातून मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ रुजली. गिरगावातील केशवजी नाईक चाळही या इतिहासाचा साक्षीदार ठरली. सुरुवातीपासूनच चाळीतील रहिवाशांनी एकत्र येऊन हा उत्सव जपला. त्यामुळे १३५ वर्षांचा हा प्रवास केवळ धार्मिक परंपरेचा नसून, सामाजिक एकोपा आणि सामूहिक सहभागाचा वारसाही सांगणारा आहे.
या गणरायाची मूर्ती साकारण्याचे काम मोरे कुटुंबीयांकडे पिढीजात चालत आहे. मूर्तीकलेची ही परंपरा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर गणरायाची सेवा म्हणून जपली जात असल्याचे सध्या गणेश चित्रशाळा चालवणारे मोरे कुटुंबीयांच्या चौथ्या पिढीचे राजेंद्र मोरे यांनी सांगितले. माझे पणजोबा गणपत भाऊ मोरे यांनी या गणेश चित्रशाळेची मुहूर्तमेढ रोवली; परंतु खरी ओळख ही काशिनाथ गणपत मोरे म्हणजे आजोबांच्या काळात मिळाली. त्यांना यासाठी सुवर्ण पदकही मिळाले आहे. आज आजोबांच्या नावाने के. जी. मोरे गणेशचित्र शाळा नामकरण करण्यात आले, अशी माहिती मोरे यांनी दिली. वडील, मग काका आणि आता मी चौथी पिढी. मूर्ती घडविण्याचे भाग्य आमच्या कुटुंबाला कसे मिळाले याबाबत कोणतीही माहिती नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात फार गणेश चित्रशाळा नव्हत्या. त्यामुळे आमच्या पंजोबाकडे ही मूर्ती घडविण्यासाठी आल्याचे मोरे यांनी सांगितले.
१३५ वर्षांपासून तीच मूर्ती
मूर्ती घडविताना पारंपरिक रूप, प्रमाणबद्धता आणि प्रसन्न भाव यांना विशेष महत्त्व दिले जाते. मूर्तीची आखणी सुरेख आणि देखणी असते. सोंडेवर कृष्ण किंवा शंकर, लक्ष्मी यांचे चित्र रेखाटले जाते. स्थापनेपासूनच मूर्तीमध्ये आजमितीस काहीच बदल केलेला नसल्याचे मोरे आवर्जून नमूद केले.
अन्य मूर्तींचाही शंभरीपार वारसा
केशवजी नाईक चाळ यांच्यासह जगन्नाथ चाळ (११८ वर्ष), आंबेवाडी (१०० हून अधिक वर्ष), ब्राह्मण सभा (१०८ वर्ष), दादरस्थित राम-मारुती रोड असे १०० वर्षांपासूनचे सार्वजनिक गणेशोत्सव, तर शंभर वर्षांपूर्वीपासूनचे घरगुती गणपतीही आमच्याकडून गणपती घेऊन जातात. आपल्याकडे २०० ते २५० मूर्ती दरवर्षी असतात. त्यापैकी काही मूर्ती विरार, डहाणू, पालघर आणि गोव्यालाही घेऊन जाणारे गणेशभक्त असल्याचे मोरे यांनी सांगितले.
पीओपी मूर्ती उंचीवर मर्यादा असावी
पीओपी मूर्ती लाखोंच्या संख्येने घडवल्या जातात. मातीच्या मूर्ती तेवढ्या संख्येने बनू शकत नाही. मुळात मातीच्या मूर्तींसाठी कारागीरच नाहीत. दुसरीकडे मातीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती वजन आणि किमतीला कमी असतात. त्यामुळे पीओपी मूर्तींवर बंदी नसावी, मात्र तिच्या उंचीवर बंधन असावी, असे मतही मोरे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.