सेस इमारतीमधील रहिवाशांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण
भाडेकरू रहिवासी कोण, मालकी कोणाची समोर येणार; समूह पुनर्विकासासाठी एकत्रित माहिती उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई शहरात आठ-दहा दशकांहून जुन्या असलेल्या १२ हजारांहून अधिक उपकर प्राप्त (सेस) इमारती असून त्यामध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरू रहिवाशांचे म्हाडाकडून बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार आहे. अनेक सेस इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी या इमारतीमध्ये कोण भाडेकरू रहिवासी आहे, त्याची मालकी कोणाची आहे आदी माहिती गोळा करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी दोन एजन्सींची नियुक्ती केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईत असलेल्या सेस इमारतीची देखभाल-दुरुस्ती म्हाडाकडून केली जाते. त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जात असली तरी अनेक इमारती दुरुस्तीपलीकडे गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे; मात्र या इमारतींमध्ये कोण वास्तव्यास आहेत, याबाबतची म्हाडाकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. आतापर्यंत उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आला तरच आम्हाला मूळ भाडेकरू आणि रहिवाशांची माहिती मिळत होती. त्यासाठी अनेकदा विकसकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे बायोमेट्रिक सर्वेक्षणाकडून मूळ रहिवासी किंवा भाडेकरू किती यांचा डेटा गोळा करण्याचा म्हाडाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी एजन्सींच्या नियुक्तीसाठी म्हाडाने निविदा काढल्या होत्या. त्यानुसार चार एजन्सींचे प्रस्ताव आले असून त्यापैकी दोघांची बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
सर्वेक्षणाबाबत नोटीसद्वारे सूचना देणार
सेस इमारतीमधील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याआधी कार्यकारी अभियंत्यांमार्फत रहिवाशांना नोटीस देऊन सर्वेक्षणाबाबत सूचना केली जाईल. सर्वेक्षणावेळी भाडेकरू किंवा रहिवासी असल्याचे पुरावे आणि आधार कार्ड सादर करावे लागणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षणासोबत घराचे क्षेत्रफळ, जीआयएस मॅपिंगदेखील केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.