‘निपुण’ नौदलाच्या ताफ्यात दाखल
मुंबईत कमिशनिंग; पाणबुडी बचाव क्षमतेला बळ
मुंबई वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप आणि पाणबुडी बचाव मोहिमांसाठी भारतीय नौदलाच्या क्षमतेत सोमवारी महत्त्वाची भर पडली. ‘आयएनएस निपुण’ या ‘निस्तार’ श्रेणीतील दुसऱ्या डायव्हिंग सपोर्ट व्हेसलचे (डीएसव्ही) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे कमिशनिंग करण्यात आले. नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने (एचएसएल) स्वदेशी पद्धतीने ‘निपुण’ची रचना आणि बांधणी केली आहे. खोल समुद्रातील विशेष मोहिमांसाठी या जहाजाची निर्मिती करण्यात आली असून, त्यावर सॅच्युरेशन, एअर आणि हेलिऑक्स डायव्हिंगसाठी आवश्यक व्यवस्था आहे. पाण्याखालील तपासणी आणि हस्तक्षेपासाठी दूरनियंत्रित अंडरवॉटर प्रणालीही बसविण्यात आली आहे. विशेष डायव्हिंग कॉम्प्लेक्स, डायनॅमिक पोझिशनिंग, जीवनरक्षक आणि वैद्यकीय सुविधांमुळे ‘निपुण’च्या माध्यमातून समुद्रात दीर्घकाळ आणि गुंतागुंतीच्या मोहिमा राबविता येणार आहेत. डायव्हर पाण्याखाली कार्यरत असताना जहाजाला विशिष्ट ठिकाणी स्थिर ठेवण्याची क्षमताही त्यात आहे.
...
संकटग्रस्त पाणबुडीसाठी मदत
पाणबुडी समुद्रात संकटात सापडल्यास बचाव मोहिमेसाठी ‘निपुण’चा वापर करता येणार आहे. ‘आयएनएस निस्तार’नंतर या दुसऱ्या जहाजाच्या समावेशामुळे नौदलाकडे पाणबुडी बचाव, डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप आणि साल्वेजसाठी दोन विशेष जहाजे उपलब्ध झाली आहेत. अशा प्रकारची विशेष क्षमता जगातील मोजक्या नौदलांकडे असल्याचे नौदलाने म्हटले आहे. ‘निपुण’ची तैनाती पश्चिम किनाऱ्यावर पश्चिम नौदल कमांडअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील पाण्याखालील मोहिमा आणि आपत्कालीन बचावकार्यात नौदलाला वेगाने प्रतिसाद देता येणार आहे. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणाच्या (एचएडीआर) मोहिमांमध्येही या जहाजाचा वापर करता येईल.
...
स्वदेशी तंत्रज्ञानाचे बळ
‘निपुण’च्या डायव्हिंग प्रणालींनी समुद्री चाचण्यांदरम्यान एकाच मोहिमेत अपेक्षित कामगिरी सिद्ध केली, असे नौदलप्रमुखांनी सांगितले. नौदल, हिंदुस्तान शिपयार्ड आणि देशातील उद्योगांच्या समन्वयातून हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ‘निश्चय, निर्भय, निपुण’ या ब्रिदाला साजेसे काम करण्याचे आवाहन त्यांनी जहाजाच्या कर्मचाऱ्यांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.