घाटातील मातीला गवताचा आधार
मध्य रेल्वेचा पर्यावरणपूरक प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पावसाळ्यात घाट विभागात मातीची धूप आणि भूस्खलनामुळे रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेसमोर निर्माण होणारे आव्हान कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने आता ‘व्हेटिव्हर’ गवताचा आधार घेतला आहे. माती घट्ट धरून ठेवणाऱ्या या गवताची लागवड करून डोंगर उतार स्थिर करण्याचा पर्यावरणपूरक प्रयोग दक्षिण-पूर्व घाटात सुरू करण्यात आला आहे.
भोर घाटातील कर्जत-लोणावळा आणि थाळ घाटातील कसारा-इगतपुरी मार्ग पावसाळ्यात अतिवृष्टी, पाण्याचा वेगवान प्रवाह, मातीची धूप आणि दरडी कोसळण्याच्या घटनांसाठी संवेदनशील आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांवर माती-दगड येण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर जैवअभियांत्रिकीचा वापर करून कायमस्वरूपी उपाय करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून केला जात आहे. व्हेटिव्हरची मुळे खोलवर आणि दाट वाढत असल्याने मातीचे कण एकत्र बांधून ठेवण्यास मदत होते. १२ ते २४ महिन्यांत मुळे तीन ते चार मीटरपर्यंत खोलवर वाढू शकतात. तसेच दाट पर्णसंभारामुळे पावसाच्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरते आणि गाळ वाहून जाण्याचे प्रमाण घटते. खंडाळा-मंकी हिलदरम्यान १,०५० चौ. मीटर, तर ठाकूरवाडी-पळसदरीदरम्यान ४,२५० चौ. मीटर क्षेत्रात प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे. या प्रयोगाच्या परिणामांनुसार संवेदनशील घाट उतारांवर त्याचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे मृदा धूप आणि भूस्खलनाचा धोका कमी होण्याबरोबरच पावसाळ्यातील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि देखभाल खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.
...
‘व्हेटिव्हर’ची ताकद
३ ते ४ मीटर - मुळांची संभाव्य खोली
१२ ते २४ महिने - वाढीसाठी लागणारा कालावधी
३० ते ४० टक्के - मातीची मजबुती वाढण्यास मदत
दुहेरी फायदा - मृदा धूप रोखणे आणि पाणी मुरण्यास मदत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.