‘ओल्ड मॉन्क’वरील बंदी कायम
स्थगिती हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : राज्यात ‘ओल्ड मॉन्क’ रमच्या विक्रीवरील बंदीच्या आदेशाला उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ३१) स्थगिती देण्यास नकार दिला; मात्र रमच्या बाटलीवरील (वेष्टन) ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडे’ आणि ‘व्हेरी ओल्ड व्हॅटेड’ यासारख्या वर्णनांवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि असे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवल्यावर कंपनीने मजकूर बदलण्याची तयारी दाखवली.
बाटलीवरील ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हा मजकूर काढून टाकण्यास आणि ‘ॲडेड फ्लेव्हर’ ठळकपणे प्रदर्शित करण्यास तयार असल्याचे उत्पादक मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरने न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने कंपनीला डिजिटल पद्धतीने छापलेला नवीन वेष्टनाचा मसुदा पुढील सुनावणीला सादर करण्याचे आदेश दिले. वेष्टनाचे कथित उल्लंघन आणि मद्याच्या परिपक्वतेबाबतच्या दाव्यांवरून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) काढलेल्या आदेशांला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कथित नियमांचे पालन न करणे आणि कृत्रिम स्वादयुक्त पदार्थांच्या वापरामुळे राज्यात ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण मद्य सात वर्षे परिपक्व झाले आहे, असा विश्वास सामान्य ग्राहक ठेवू शकतो, याबद्दल खंडपीठाने चिंता व्यक्त केली. तुम्ही जनतेची दिशाभूल करीत असून ७ इयर्स ओल्ड म्हणजे सात वर्षे जुनी, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
तांत्रिक फरक समजतील का?
वैधानिक नियमांनुसार, बाटलीवर ब्लेंडेड स्पिरिट्स वेगळे दर्शवले होते, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, सामान्य ग्राहकाला असे तांत्रिक फरक समजतील का, या देशातील प्रत्येक नागरिक इतका सुशिक्षित असता तर किती बरे झाले असते, असा टोलाही न्यायालयाने हाणला. अतिरिक्त स्वादवर्धकांची माहिती कशी उघड केली गेली, यावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. उत्पादनाच्या पॅकेजिंगची तपासणी केल्यानंतर, आपण भिंग वापरून पाहिले, तरी आपल्याला ती माहिती सापडली नसल्याचेही न्यायालयाने सुनावले.
याचिकेला विरोध
‘एफएसएसएआय’ नियमांनुसार न्यूट्रल स्पिरिट्समध्ये मान्यताप्राप्त स्वादवर्धक पदार्थांना परवानगी आहे आणि सर्व घटक उघड केले गेले होते. त्यानंतरही ओल्ड मंकवर निवडक कारवाई केल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला. दुसरीकडे, अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी याचिकेला विरोध केला आणि रमला त्याची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंध नैसर्गिकरीत्या उसाच्या आंबवण्याच्या प्रक्रियेतूनच मिळाला पाहिजे, असा युक्तिवाद केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.