पार्थिव ताब्यात घेण्यास नकार
डॉ. रूपनवर आत्महत्याप्रकरणी न्यायाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : फलटण येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. ठोस कारवाईबाबत शासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, २८ जुलैला बंदुकीच्या परवान्यासाठी आवश्यक वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी कोंडे देशमुख नावाची व्यक्ती रुग्णालयात आली होती. तपासणीतील काही बाबींमुळे डॉ. रूपनवर यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने वाद झाला. संबंधित व्यक्तीसोबत आलेल्यांनी धक्काबुक्की व धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कोंडे देशमुख यांनी आपण माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पीए असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला असून या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. रूपनवर यांच्यावर कार्यमुक्ती अथवा निलंबनाची कारवाई झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर ते मानसिक तणावाखाली गेले. आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठी आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी तसे म्हटले होते, असे राजेंद्रचे भाऊ सागर रूपनवर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार व चौकशी समिती नेमण्यात आली होती; मात्र न्याय मिळत नसल्याने तणाव वाढल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारादरम्यान डॉ. रूपनवर यांचा मृत्यू झाला. आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणार आहे.
....
भूमिका स्पष्ट करा ः रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा कष्ट करून डॉक्टर होतो आणि त्याच्यावर अन्याय होत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येपूर्वी इशारा देऊनही प्रभावी कारवाई झाली नाही, हा गंभीर प्रश्न असल्याचे पवार यांनी सांगितले. केवळ एसआयटी नेमणे किंवा अधिकाऱ्यांना निलंबित करणे पुरेसे नसून, चौकशी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, असेही पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.