गणेशाच्या आराशीत परंपरेला ‘मॉडर्न’ लूक!
कापूस, खण, मोती, आर्टिफिशियल फुलांना मागणी; थर्माकोलला पुठ्ठ्याचा पर्याय, पुनर्वापराच्या सजावटीला पसंती
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : गणेशोत्सवातील आरास यंदा पारंपरिक चौकटीत राहूनही आधुनिक होत आहे. कापूस, खण, उपरणी आणि फुलांची पारंपरिक सजावट कायम असली तरी त्याच साहित्याला नवे रूप देण्याकडे कल वाढला आहे.
मोती, सॅटिन (अत्यंत मऊ, गुळगुळीत आणि चमकदार कापड), आर्टिफिशियल फुले, बांधणी, हाताने तयार केलेल्या वस्तू आणि आकर्षक लटकन यामुळे गणेशाची आरास अधिक आधुनिक आणि देखणी दिसत आहे. त्याचवेळी पर्यावरणाचा विचार करीत थर्माकोलऐवजी पुठ्ठ्याची मखरे आणि अनेक वर्षे वापरता येणाऱ्या सजावटीच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे.
पूर्वी कापसाचा वापर प्रामुख्याने पारंपरिक वस्त्र म्हणून केला जात होता. आता त्याच कापसाचे हार तयार करून आरास केली जात आहे. फुलांच्या कंठांऐवजी मोती, सॅटिन आणि आर्टिफिशियल फुलांचे मिश्रण करण्याचा प्रयोगही ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. रेडीमेड सजावटीपेक्षा आपल्या गणेशमूर्तीच्या आकाराला आणि आराशीतल्या संकल्पनेला साजेशी खास सजावट हवी, अशी मागणी वाढली आहे. सजावटीच्या साहित्याचे विक्रेते मयूरेश खामकर यांनी बाजारातील या बदलाकडे लक्ष वेधले.
दहा-बारा दिवसांसाठी टिकाऊ आरास
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सजावटीचे साहित्य निवडताना केवळ सौंदर्य नव्हे, तर टिकाऊपणालाही महत्त्व दिले जात आहे. दहा ते बारा दिवसांच्या उत्सवात नैसर्गिक फुलांचे हार खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोत्यांचे हार आणि आर्टिफिशियल फुलांकडे मंडळांचा कल वाढला आहे. प्रकाशयोजनेत हे साहित्य अधिक उठून दिसत असल्याने त्याचा वापरही वाढत आहे.
थर्माकोलला पुठ्ठ्याचा पर्याय
पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढल्याने थर्माकोलच्या मखराला पुठ्ठ्याचा पर्याय मिळाला आहे. पूर्वी केळीची पाने आणि नैसर्गिक फुलांचा वापर केला जात असे. मात्र ही सजावट काही दिवसांत खराब होत असल्याने थर्माकोलचा वापर वाढला. आता त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम लक्षात घेऊन पुठ्ठा आणि पुनर्वापर करता येणाऱ्या सजावटीच्या वस्तूंना पसंती मिळत आहे.
घरगुती गणेशापासून मंडळांच्या ४० फूट मूर्तीपर्यंत
छोट्या घरगुती गणेशापासून मोठ्या सार्वजनिक मंडळांपर्यंत सजावटीच्या साहित्याची व्याप्ती वाढली आहे. लटकन, घंट्या, कंठी आणि हारांपासून ते २२ आणि ४० फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी मोठ्या आकाराच्या आर्टिफिशियल फुलांपर्यंत साहित्य बाजारात उपलब्ध आहे. आठ फुटांपर्यंतच्या कंठी उपलब्ध असून, मोठ्या मूर्तींसाठी आकार आणि संकल्पनेनुसार सजावटीचे साहित्य तयार केले जात आहे.
दरवर्षी नवा ट्रेंड; परंपरेला मात्र कायम स्थान
गणेश सजावटीच्या बाजारात फॅशनप्रमाणे दरवर्षी नवे ट्रेंड येत आहेत. गेल्या वर्षी घुंगराच्या सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. एखाद्या घरातील किंवा मंडळातील आरास पाहून त्याच धर्तीवर सजावट करण्याची मागणी वाढते आणि काही काळात ती वस्तू नवा ट्रेंड ठरते. मात्र एक-दोन वर्षांनंतर ग्राहक पुन्हा नवे डिझाइन, रंगसंगती आणि साहित्य शोधू लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.