कंत्राटदारावरून स्थायी समितीत रणकंदन
उपसा पंपावरून भाजप-विरोधकांमध्ये खडाजंगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कुर्ला (पूर्व) येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळील पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी आणलेल्या ७.१४ कोटी रुपयांच्या उपसा पंप प्रस्तावावरून महापालिकेच्या स्थायी समितीत बुधवारी (ता. २) जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. हे काम दिलेल्या संबंधित कंत्राटदार कंपनीचा मालक कोण, यावरून मनसे-काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप आमनेसामने आल्याने स्थायी समितीतील वातावरण तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी कंत्राटदार कंपनीवर थेट प्रश्न उपस्थित करीत सभागृहात जोरदार हल्ला चढवला. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळणारी ही कंपनी कोण आहे, भाजपची सत्ता आल्यानंतरच ही कंपनी कशी काय उदयास आली, तिचा मालक कोण, व्यवस्थापक कोण आणि त्यांचा राजकारणाशी काय संबंध आहे, मालकाची खरी पार्श्वभूमी सांगा,’ अशी मागणी किल्लेदार यांनी केली. काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आझमी यांनीही या प्रस्तावाच्या वेळेवर बोट ठेवले. ‘पावसाळा संपत आला असताना सप्टेंबरमध्ये हा प्रस्ताव कशासाठी, दरवर्षी पाणी तुंबण्यावर १५ ते २० कोटी रुपये खर्च केले जातात, मग कायमस्वरूपी पंपहाऊस उभारण्याची योजना प्रशासनाने आजपर्यंत का आणली नाही,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांच्या या आरोपांना स्थायी समिती अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर म्हणाले, ‘कंत्राटदार मराठी असेल तर मराठी माणसाने व्यवसाय करायचा नाही का, ही कंपनी गेल्या १५ वर्षांपासून पालिकेत काम करीत आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.’ स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही मनसेला टोला लगावला.
अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण
अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी सांगितले, की ‘स्वामी विवेकानंद शाळेजवळील नेहरूनगर नाल्यात भरतीच्या पाण्यामुळे हा परिसर जलमय होतो. यासाठी ६,००० घनमीटर प्रति तास क्षमतेचे चार उदंचन संच आणि पेनस्टॉक गेट्ससाठी २०२६ ते २०२९ या चार वर्षांसाठी मे. एआरडब्ल्यू इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीला ७.१४ कोटींचे कंत्राट दिले आहे. कंपनी जुनीच असून २०२२ मध्ये तिचे नाव बदलले आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.