स्थायी समितीमध्ये ‘नॉट टेकन’चा पाढा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कोणतीही पूर्वकल्पना न देता शेकडो कोटींचे प्रस्ताव थेट मंजुरीसाठी आणण्याच्या महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारावर स्थायी समितीने मंगळवारी कठोर कारवाई केली. नियमांची पायमल्ली करून आणलेले ३६ हून अधिक विषय स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ‘नॉट टेकन’ (नाकारले) करीत प्रशासनाला मोठा दणका दिला. तसेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या कामांचे तातडीने त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याचे कडक निर्देश दिले.
बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक यशोधन फणसे यांनी वाढीव किमतीचे प्रस्ताव थेट मंजुरीसाठी आणल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनीही महत्त्वाचे विषय स्थायी समितीला अंधारात ठेवून सादर करणे चुकीचे आहे, असे सांगत प्रशासनाला धारेवर धरले. सर्वपक्षीय नगरसेवकांचा संताप पाहून अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. ‘दर बैठकीत २५ ते ३० प्रस्ताव कोणतीही माहिती न देता आणले जातात. कलमांचा गैरवापर करून विशिष्ट ठेकेदारांचे भले केले जात आहे. कागदावर दाखवलेली अनेक कामे प्रत्यक्षात सुरूच नाहीत,’ असा थेट आरोप त्यांनी केला. यापूर्वी ५,४७४ कोटींचे प्रस्ताव असेच आणले गेले होते, याबाबतची आठवण करून देत अध्यक्षांनी प्रशासनाला तीव्र शब्दांत खडसावले. या वेळी अध्यक्षांनी पारदर्शकतेचा अभाव असल्याने सर्व प्रस्ताव थेट नाकारले. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांतील कामांची त्रयस्थ संस्थेकडून सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले. इतकेच नाही तर प्रशासनाचा मनमानी कारभार न थांबल्यास कठोर कारवाईचा इशाराही या वेळी शिंदे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.