‘सीएसआर’चा नियोजनबद्ध वापर करा : आरोग्यमंत्री आबिटकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘ ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा गरजेनुसार आणि नियोजनबद्ध वापर करावा,’ असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी (ता. २) सांगितले.
भारतीय औद्योगिक परिसंघातर्फे मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित सामाजिक उत्तरदायित्व परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य संस्थांचे पायाभूत सुविधांमध्ये बळकटीकरण, डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था, आधुनिक वैद्यकीय उपकरणे तसेच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आबिटकर यांनी नमूद केले. आरोग्य विभागातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. विभागाच्या प्राधान्यक्रमानुसार उद्योगांनी उपक्रमांची आखणी केल्यास उपलब्ध निधीचा अधिक परिणामकारक वापर करता येईल, असे आबिटकर म्हणाले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य संस्थांची सद्यःस्थिती, उपलब्ध सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभ्यास करून निधीच्या वापरासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. स्थानिक गरजांचा विचार करून उपक्रम राबविल्यास त्याचा लाभ अधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो, असेही त्यांनी सांगितले. या परिषदेला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भारतीय औद्योगिक परिसंघाच्या सामाजिक उत्तरदायित्व समितीचे अध्यक्ष बी. थिआगाराजन, माजी अध्यक्ष राजेश शहा, शिवानी कुमार तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.