मुंबई

गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा पाळा; लेझर टाळा!

CD

गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा पाळा; लेझर टाळा!
महिला सुरक्षेला प्राधान्य; मंडळांमध्ये ‘त्वरित संपर्क कक्ष’ उभारण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ४ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपकाची मर्यादा पाळावी, तसेच लेझर लाइट्सचा वापर टाळावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्त कार्यालयात नुकत्‍याच झालेल्‍या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
​कायदा व सुव्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर, सुधीर साळवी, बाळासाहेब कांबळे, किरण तावडे, वासुदेव सावंत, उमेश नाईक, सतीश नायक, ओंकार सावंत, निखिल मोरये, सुधाकर पडवळ, भूषण मडव, गणेश गुप्ता, संजय शिर्के व सिद्धेश खानविलकर यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
​गर्दीच्या मंडळांसाठी स्थानिक पोलिस ठाण्यांमधून एका नोडल पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच प्रत्येक पोलिस विभागासाठी डिजिटल संपर्क प्रणाली असावी, अशी मागणी समितीने केली. मोठ्या मंडळांतील १० ते १२ निवडक स्वयंसेवकांना पोलिस व पालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात यावे. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग, महिला स्वयंसेवक, छेडछाडविरोधी तक्रार व्यवस्था, सीसीटीव्ही आणि पोलिस हेल्पलाइनची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करण्यावर भर दिला जाईल. पोलिस आयुक्तांनीही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.
अफवा रोखण्यासाठी आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस व मंडळांदरम्यान जलद संपर्क कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. प्रसादाचे वाटप करणाऱ्या ठिकाणी मंडळाचा अधिकृत कार्यकर्ता असावा. ​धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी मंडळांनी घ्यावी. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, अशा अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या. गणेशोत्‍सव मंडळांच्या ऑनलाइन परवानग्‍या प्रलंबित असल्‍यास त्‍या ताबडतोब मंजूर कराव्यात, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

हरवलेली मुले, ज्‍येष्‍ठांसाठी कक्ष
हरवलेली मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी मंडपात ‘सुरक्षित केंद्र’ आणि ‘हरवले-सापडले कक्ष’ सुरू करावेत, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.

आवाजाची मर्यादा पाळा!
नियमानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ५५ डेसिबल आणि रात्री १० नंतर ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. लेझर लाइट्सचा वापर टाळावा, नियमांचे पालन करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. दहिबावकर यांनी केले.

दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करा!
गणेशोत्‍सव मंडळांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यानच्या ट्रॉलीची चाके पूर्वतपासणी करूनच वापरावीत, जेणेकरून अपघात टळतील. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्यव साधून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्‍या.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

Pune News : राज्यसेवा मुलाखतीसाटी ‘बार्टी’कडून आर्थिक सहाय्य

SCROLL FOR NEXT