भेसळीवर एफडीएचा वॉच!
सर्व सण-उत्सवांसाठी एकच कायमस्वरूपी स्थायी आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महाराष्ट्रातील वर्षभरातील सण, उत्सव, यात्रा, उरूस आणि धार्मिक पर्वांच्या काळात होणाऱ्या अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज राहणार नसून, वर्षभरातील सर्व सणांसाठी एकच कायमस्वरूपी स्थायी आदेश लागू राहणार आहे. देशात अशा प्रकारचा पहिलाच सर्वसमावेशक आदेश असल्याचा दावा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले, की या आदेशानुसार सणाच्या २१ दिवस आधीपासून ते सणानंतर ३० दिवसांपर्यंत अन्नसुरक्षेची चक्रबद्ध मोहीम राबविली जाणार आहे. सणांच्या काळात दूध, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, मिठाई, बेसन, सुका मेवा, मांस यांसारख्या पदार्थांची मागणी अचानक वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत भेसळयुक्त, बनावट किंवा असुरक्षित अन्न बाजारात येण्याची शक्यता असल्याने एफडीएने ही कायमस्वरूपी यंत्रणा उभी केली आहे.
एफडीएने चार टप्प्यांत अन्न सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात सणाच्या २१ ते १५ दिवस आधी जोखीम क्षेत्रांचे नकाशांकन, गुप्तवार्ता संकलन, पथकांची नियुक्ती, रॅपिड टेस्ट किटची उपलब्धता आणि प्रयोगशाळांची तयारी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सणाच्या १४ ते १ दिवस आधी उत्पादन केंद्रे, गिरण्या, खवा मंडई, गोदामे, शीतगृहे आणि घाऊक बाजारांची तपासणी तसेच रात्री-पहाटेच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले जाईल. तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सणाच्या दिवशी बाजारपेठा, मिठाई दुकाने व खाद्यगृहांवर देखरेख ठेवली जाईल. ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’च्या माध्यमातून जागेवर नमुना तपासणी केली जाणार आहे. चौथ्या टप्प्यात सणानंतर ३० दिवसांपर्यंत प्रयोगशाळा अहवालांचा पाठपुरावा, खटला मंजुरी, न्यायनिर्णय आणि जप्त मालाची विल्हेवाट यावर कारवाई होईल.
...
या पदार्थांवर विशेष लक्ष
उपवासाचे पदार्थ, दूध-दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी-बर्फ, मिठाई व खाद्यरंग, खाद्यतेल, फळे, सुका मेवा-बेसन, बेकरी पदार्थ, ई-कॉमर्समधील खाद्यपदार्थ आणि आयात अन्न अशा ११ उच्च जोखीम श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.
...
सामूहिक जेवणावळींवर नजर
महाप्रसाद, इफ्तार मेजवानी, अन्नछत्र, लंगर व भंडारा आयोजित करणाऱ्यांना किमान सात दिवस आधी एफडीएला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयोजक, केटरर, मेनू, पाण्याचा स्रोत, लाभार्थी संख्या आणि कच्च्या मालाची माहिती द्यावी लागणार आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, ख्रिसमसपासून स्थानिक यात्रा, जत्रा व उरुसांपर्यंत सर्व सण या आदेशाच्या कक्षेत आहेत. ‘हा आदेश कोणत्याही धर्मासाठी नसून नागरिकांच्या अन्नसुरक्षेसाठी आहे. सणाचा आनंद असुरक्षित अन्नामुळे बाधित होऊ नये, हाच त्यामागचा उद्देश आहे,’ असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.