गेटवेजवळ समुद्रात फेरीबोट बंद
३८ प्रवाशांची दुसऱ्या बोटीच्या सह्याने सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्रात फेरफटका मारून परतणाऱ्या ‘अन्वरी’ फेरीबोटीचे इंजिन गुरुवारी रात्री अचानक बंद पडल्याने ३४ प्रवाशांसह चार क्रू सदस्य समुद्रात अडकले होते. गेटवेपासून सुमारे दीड नॉटिकल मैल अंतरावर रात्री ८.३०च्या सुमारास ही घटना घडली. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी जवळील ‘आझाद हिंद’ फेरीबोटीची मदत घेतली. अवघ्या ४० मिनिटांत ‘अन्वरी’ला ओढून गेटवे ऑफ इंडिया जेट्टी क्रमांक दोन येथे रात्री ९.१० वाजता आणण्यात आले. सर्व ३८ जण सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला.
समुद्रात सुमारे अर्धा तास फेरफटका मारून परतणारी ‘अन्वरी’ गेटवेपासून दीड नॉटिकल मैल अंतरावर असताना तिचे इंजिन अचानक बंद पडले. त्यानंतर बोट समुद्रात अडकून पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच बिट क्रमांक एकचे पोलिस शिपाई अभिजित शिंदे आणि पोलिस नाईक गुरव यांनी मदतकार्य सुरू केले. काही मिनिटांत पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास असलेल्या बोटींची माहिती घेतली. त्यावेळी ‘आझाद हिंद’ फेरीबोट जवळ असल्याचे समजले. पोलिसांनी तिचे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जुनेद मुल्ला यांच्या माध्यमातून ‘आझाद हिंद’वरील क्रू सदस्यांशी संपर्क साधण्यात आला आणि बोट तातडीने ‘अन्वरी’च्या मदतीसाठी रवाना करण्यात आली. रात्री ९.१० वाजता ‘आझाद हिंद’ घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिच्या मदतीने ‘अन्वरी’ला ओढून गेटवे ऑफ इंडिया जेट्टी क्रमांक दोन येथे आणण्यात आले. सर्व ३४ प्रवासी आणि चार क्रू सदस्य सुखरूपपणे जेट्टीवर पोहोचले.
रात्रीच्या फेरीला परवानगी कोणी दिली
गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. जलवाहतूक सुरू झाल्यानंतर घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे रात्री आठनंतर फेरीबोटींची नियमित वाहतूक बंद होत असल्याचे सांगितले जाते. असे असताना ‘अन्वरी’ रात्री साडेआठच्या सुमारास समुद्रात का होती, तिला निर्धारित वेळेनंतर प्रवासी वाहतुकीची परवानगी कोणी दिली. बोटीची तांत्रिक तपासणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.