शाळांनी एआय वापराच्या सीमा ठरवाव्यात
मानवी अनुभव, निर्णयक्षमता आणि संवाद जपण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
मुंबई, ता. ४ : मानवी अनुभव, निर्णयक्षमता आणि परस्पर संवाद यांना प्राधान्य देत शाळांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराच्या स्पष्ट सीमा निश्चित कराव्यात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘एक्स्ट्रामार्क्स’तर्फे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘एआय क्लासरूम कॉन्क्लेव्ह’मध्ये हे मत मांडण्यात आले. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनावर एआयचा होणारा परिणाम या विषयावरील परिसंवादात प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शैक्षणिक समन्वयक, आयटी प्रमुख, विश्वस्त आणि शाळा व्यवस्थापनातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
एआयमुळे अध्यापन आणि मूल्यमापन अधिक प्रभावी होऊ शकते; मात्र एआयचा वापर कुठे, किती आणि कसा करायचा, हे शाळांनी निश्चित करणे आवश्यक आहे, असे शिक्षणधोरण तज्ज्ञ शैलेंद्र शर्मा यांनी सांगितले. एआयचा वापर करताना विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्याची क्षमता आणि मानवी संवादाची प्रक्रिया अबाधित राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पाठांतरावर आधारित मूल्यमापनाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या आकलन, विश्लेषण आणि सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या पद्धती विकसित कराव्यात. तसेच नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही परिसंवादात सांगण्यात आले. अनुभवाधारित शिक्षणाचा अध्यापनात अधिक समावेश करण्यावरही तज्ज्ञांनी भर दिला.
---
स्थानिक गरजांनुसार वापर व्हावा : पूनमसिंह जामवाल
तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शाळेच्या स्थानिक गरजांनुसार झाला पाहिजे. वर्गात कोणतेही तंत्रज्ञान वापरले तरी विद्यार्थी आणि वर्गाची गरज लक्षात घेऊन शाळांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे ‘एक्स्ट्रामार्क्स’च्या सीबीओ पूनमसिंह जामवाल यांनी सांगितले. अध्ययन आणि अध्यापनाच्या विविध टप्प्यांवर एआयचा प्रभावी वापर कसा करता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक एक्स्ट्रामार्क्सच्या चरनीता कौर यांनी सादर केले. भविष्याभिमुख कौशल्ये विकसित करताना शाळांना एआयचा अर्थपूर्ण आणि जबाबदार वापर कसा करता येईल, यावरही परिषदेत विचारमंथन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.