जादा भाडे घ्याल तर याद राखा!
परिवहन विभागाचा कठोर कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभागाने कंबर कसली आहे. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे, गैरवर्तन करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा व बसचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि प्रमुख वाहतूक केंद्रांवर प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांनी वाहनांची सर्व कागदपत्रे वैध ठेवावीत. तसेच रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने किंवा परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, रिक्षाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणेही संबंधितांना महागात पडणार आहे.
खासगी तसेच प्रवासी बसचालक आणि मालकांनाही विशेष दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसमधील आपत्कालीन दरवाजा किंवा खिडकी, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असणे बंधनकारक आहे. मद्यपान करून किंवा बेदरकार वाहन चालविणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई होणार आहे.
नियमांचे पालन करा!
तक्रारीसाठी ई-मेलची सुविधा जादा भाडे आकारणी, गैरवर्तन किवा नियमभंग आढळल्यास प्रवाशांनी संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा मार्ग आणि तक्रारीचा तपशील नमूद करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरटीओने केले आहे. गणेशोत्सव काळात वाहतूकदारांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.