स्कूल बॅग पॉलिसीची अंमलबजावणी करा!
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे निर्देश
मुंबई, ता. ५ : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतिप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी, असे निर्देश शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
जास्त वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शारीरिक वाढीवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या धोरणानुसार, पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान मुलांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही. या दृष्टीने शाळांनी नियोजन करावे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये, तसेच त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणली जावीत, यासाठी वर्गनिहाय ‘दप्तर वेळापत्रक’ तयार करावे. याशिवाय, विद्यार्थ्यांनी दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून शाळांनी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. शाळांनी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात यावा.