कर्णकर्कश डीजे, लेझर लाइटपासून सावध राहा
आयएमए महाराष्ट्राचा इशारा; कानांची श्रवणशक्ती कमी होण्यासह डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : सण, धार्मिक मिरवणुका, विवाहसोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे तसेच तीव्र लेझर लाइटचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राने केले आहे.
मोठ्या आवाजाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे कानात सतत आवाज येणे, श्रवणशक्ती कमी होणे, कान दुखणे, डोकेदुखी, चक्कर, झोपेच्या समस्या, चिडचिड आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. वारंवार मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यास कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असल्याचे आयएमए महाराष्ट्राने म्हटले आहे.
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर मोठ्या आवाजाचा विशेष परिणाम होऊ शकतो. त्यांच्या श्रवणशक्तीबरोबरच झोप, एकाग्रता आणि वर्तनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनीही मोठा आवाज शक्यतो टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
लेझरमुळे रेटिनाला इजा होण्याची शक्यता
तीव्र लेझर किरण थेट डोळ्यांवर पडल्यास डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, झगमगाट आणि अंधुक दिसणे अशा समस्या होऊ शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये डोळ्याच्या रेटिनाला इजा होऊन कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येण्याचा धोका असतो. “लेझर किरण कधीही प्रेक्षकांच्या डोळ्यांकडे थेट वळवू नयेत. नागरिकांनीही लेझर लाइटकडे थेट पाहणे टाळावे. वेगाने चमकणाऱ्या स्ट्रोब लाइटमुळे मायग्रेन, चक्कर आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये झटके येण्याची शक्यताही असते,” असे आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी सांगितले. लेझरच्या संपर्कानंतर दृष्टी अंधुक होणे किंवा दृष्टी कमी झाल्याचे जाणवल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
डीजेपासून अंतर ठेवण्याचे आवाहन
नागरिकांनी डीजे आणि मोठ्या आवाजाच्या स्पीकरपासून शक्य तितके अंतर ठेवावे. तसेच अशा ठिकाणी दीर्घकाळ थांबणे टाळावे. पालकांनी लहान मुलांना मोठ्या आवाजाच्या स्पीकरजवळ उभे करू नये, असे आवाहन केले. सण-उत्सवांचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून, ध्वनी आणि प्रकाशाच्या अतिवापरामुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आयोजकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे संघटनेने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.