जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन
पुढील जबाबदाऱ्यांसाठी कामगिरीचा आधार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी कामगिरीच्या आधारे गुणांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या तीन वर्षांतील कामकाजाचा आढावा घेऊन १०० गुणांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण केले जाणार आहे. या मूल्यांकनाचा उपयोग पुढील जबाबदाऱ्या आणि नियुक्त्यांच्या वेळी केला जाणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विभागाने कामगिरीआधारित मूल्यांकनाची ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय देखरेखीखाली ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. किमान तीन वर्षांची (३१ मार्च २०२६ मध्ये) सेवा पूर्ण केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील कामकाजाच्या आधारे अधिकाऱ्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाईल.
११ निकषांवर होणार मूल्यांकन
गुणांकनासाठी एकूण ११ निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यात रुग्णसेवा, तक्रार निवारण, नेतृत्वक्षमता, विशेष कौशल्य, प्रशिक्षण आणि संवादकौशल्य यांचा समावेश आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीचा वापर, तसेच औषधांचा पुरवठा, आहार, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचे व्यवस्थापन यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
पुढील तीन वर्षांच्या नियोजनाचाही विचार
केवळ मागील कामगिरीवरच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्याने पुढील तीन वर्षांसाठी केलेल्या कामाच्या नियोजनाचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे मूल्यांकनात चालू कामकाजासोबत भविष्यातील नियोजनालाही स्थान देण्यात आले आहे.
शिस्तभंगाच्या प्रकरणांतील अधिकारी अपात्र
नामनिर्देशनासाठी संबंधित अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील आणि किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित किंवा प्रस्तावित नसावी. अपहाराच्या प्रकरणात सहभाग नसणे आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसणे, तसेच चारित्र्य आणि सचोटीबाबत आक्षेप नसणे, हेही निकष ठेवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.