शाळांमध्ये ‘संविधानिक मूल्ये’ रुजणार!
महापालिकेच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, नागरी जबाबदारी, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये रुजवण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत इयत्ता पहिली ते दहावीच्या तीन लाख ३१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता सहावीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाची छपाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी ‘मे. दिशातरंग व्हेंचर्स प्रा. लि.’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा आठ कोटी ९० लाख ८३ हजार १६१ खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेने हा कृतिआधारित उपक्रम आखला आहे. याअंतर्गत विविध माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार शैक्षणिक साहित्य आणि उपक्रम तयार केले जातील. या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या पहिली ते दहावीच्या एकूण ३,३१,३०७ विद्यार्थ्यांना (प्राथमिक विभागातील २,८४,१९४ आणि माध्यमिक विभागातील ४७,११३ विद्यार्थी) थेट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विशेष पुस्तकाची छपाई केली जाणार आहे. या कामासाठी ‘जेम’ पोर्टलवर ‘प्रिंटिंग सर्व्हिसेस’ वर्गवारीतून निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये तीन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तांत्रिक व नमुना पडताळणीनंतर तिन्ही कंपन्या पात्र ठरल्या. अंतिम लिलावात मे. दिशातरंग व्हेंचर्स प्रा. लि. यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा ३.५२ टक्के कमी दर सादर केल्याने त्यांच्या नावाची शिफारस शिक्षण विभागाने केली आहे. या कंत्राटदाराने अंदाजापेक्षा ३.५२ टक्के कमी दर सादर केल्याने ८,९०,८३,१६१.४६ या मंजूर कंत्राट रकमेवर त्यांची निवड करण्यात आली आहे. कार्यादेश दिल्यानंतर ४५ दिवसांत शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केला जाईल. पुढील एक वर्षाच्या कालावधीत हा उपक्रम पूर्णपणे राबवला जाणार आहे. सध्या या प्रस्तावाला स्थायी समितीच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. या उपक्रमामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची ओळख होऊन एक संवेदनशील व कर्तव्यदक्ष नागरिक घडण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.