दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण रखडले
कंत्राट रद्द करण्याची भाजप नगरसेवक नार्वेकर यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कोट्यवधी रुपये खर्च करूनही दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. तीन वर्षांत जेमतेम १५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीचे सुमारे १,३०० कोटी रुपयांचे कंत्राट तातडीने रद्द करावे, अशी मागणी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दक्षिण मुंबईतील नागरिकांना खड्डे आणि वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी मे २०२४ मध्ये ‘एनसीसी लिमिटेड’ला हे कंत्राट देण्यात आले होते. यापूर्वीच्या कंत्राटदाराने कामाला सुरुवातच न केल्याने त्याचे कंत्राट रद्द करून ही नवीन नियुक्ती करण्यात आली होती; मात्र दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही काम पूर्ण करण्यात संबंधित कंत्राटदाराला अपयश आले आहे. महापालिकेच्या अधिकृत डॅशबोर्डवरील माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ‘झोन १’मध्ये रस्त्यांच्या कामाची प्रगती अत्यंत निराशाजनक आहे. या विभागात एकूण ८३.४१ किलोमीटर लांबीच्या ३३५ रस्त्यांचे काँक्रीटीकरण प्रस्तावित होते. त्यापैकी केवळ १४५ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ६३ रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत; तर १२७ रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरुवातही झाली नाही. कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, मलबार हिल, डोंगरी, मोहम्मद अली रोड, भायखळा आणि नागपाडा या गर्दीच्या ठिकाणी रस्ते उखडलेल्या स्थितीत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे पदपथांचीही दुरवस्था झाली आहे.
कंत्राटदाराची अपुरी क्षमता आणि बेपर्वाई लक्षात घेता पालिकेने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी व हे कंत्राट रद्द करावे. तसेच, हे संपूर्ण काम एकाच संस्थेला देण्याऐवजी त्याचे विभागनिहाय वर्गीकरण करून स्थानिक सक्षम कंत्राटदारांमार्फत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.