गणेशोत्सवासाठी कोकणाकडे एसटीची धाव
मुंबई, ठाणे, पालघर विभागांतून ५,२२० जादा बस सोडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कोकणातील सण, उत्सव, परंपरा जपताना कोकणी माणूस आणि गणेशोत्सव असे एक अतूट नाते राहिले आहे. यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. मुंबई विभागातून १,९१७ बस आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बस सोडण्यात येणार आहेत. गौरी गणपती सणापर्यंत कोकणातील प्रत्येक गाव गणेशोत्सवापर्यंत जागा होणार आहे. कोकणात बंद असलेली तीन लाखांपेक्षा जास्त घरे गणेशोत्सवात उघडली जाणार आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकणातील थेट गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच सुखरूप पोहोचवते. गणेशोत्सवासाठी व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे.
बस स्थानके आणि बस थांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर
गणेशोत्सवाच्या काळात एसटीची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व प्रमुख बस स्थानके आणि बस थांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई विभागातील बस आरक्षण
आगार - आरक्षित बससंख्या
मुंबई सेंट्रल २८४
परळ १,३४७
कुर्ला २४३
पनवेल ३९
उरण ४
एकूण १,९१७
गणेशोत्सवासाठी मुंबई विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी यंदाही एसटीला पसंती दिली आहे. एसटीच्या १,९१७ बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी बस आरक्षण फुल झाले आहे.
- अभिजित पाटील, विभाग नियंत्रक, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.