एसी लोकलमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा
गर्दीमुळे दरवाजे बंद होण्यास विलंब; मागील फेऱ्या रखडल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. ७) एसी (वातानुकूलित) लोकलच्या विलंबाचा फटका मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीला बसला. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी ८.५४ वाजताच्या अर्ध जलद एसी लोकलमध्ये गर्दी असल्याने स्वयंचलित दरवाजे वेळेत बंद झाले नाहीत. त्यामुळे कल्याणहून ही लोकल पाच मिनिटांच्या विलंबाने, सकाळी ८.५९ वाजता रवाना झाली. डोंबिवली स्थानकातही दरवाजे बंद होण्यासाठी सुमारे सहा मिनिटे लागल्याने मागील लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला.
एसी लोकलचे दरवाजे स्वयंचलित असल्याने दरवाजांच्या परिसरात प्रवासी असल्यास ते बंद होत नाहीत. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्यानंतरच लोकल रवाना करता येते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत दरवाजे बंद होण्यास लागणाऱ्या अतिरिक्त वेळेचा परिणाम मागील लोकलच्या वाहतुकीवर होतो. सोमवारी सकाळी यामुळे मागील लोकलना सिग्नलच्या प्रतीक्षेत थांबावे लागले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या खोळंब्यामुळे नोकरदारवर्गाला कार्यालय गाठताना धावपळ करावी लागली. वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचा प्रवासही अधिक त्रासदायक झाला. दरम्यान, एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे वारंवार होणारा विलंब टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
टिटवाळा ब्लॉकची भर
टिटवाळा स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या १५ दिवसांच्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेची वाहतूक आधीच विस्कळित झाली आहे. काही फेऱ्या रद्द झाल्याने उपलब्ध लोकलवर प्रवाशांचा भार वाढला आहे. त्यात एसी लोकलच्या विलंबाची भर पडल्याने सोमवारी सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना आणखी त्रास सहन करावा लागला. टिटवाळा ब्लॉकमुळे यापूर्वीच प्रवाशांना २० ते २५ मिनिटांच्या विलंबाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.